बंगळुरू ( कर्नाटक) - झारखडंसह महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडताना महत्त्वाची बातमी आहे. बजेटनुसारच गँरटीची घोषणा करावी, अशा सूचना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्या आहेत. "जर तसे केले नाही तर राज्य दिवाळखोरीत जाईल," अशी त्यांनी भीती व्यक्त केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, " जर नियोजनाचा अभाव असेल तर (राज्याला) आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. त्याचा येणाऱ्या पिढ्यांना नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे गॅरंटीची घोषणा करताना काळजीपूर्वक विचार करावा," असा काँग्रेस अध्यक्षांनी सल्ला दिला. "जेवढे शक्य असेल तेवढेच आश्वासन द्यावीत," असेही त्यांनी सांगितलं.
Bengaluru, Karnataka | Congress President Mallikarjun Kharge says " i have said that they (maharashtra congress) should not announce 5, 6, 10 or 20 guarantees. guarantees should be announced based on the budget. otherwise, there'll be bankruptcy. if there's no money for roads,… pic.twitter.com/mHtukqmpdc
— ANI (@ANI) November 1, 2024
मल्लिकार्जून खरगे यांनी वित्तीय शिस्त बाळगण्याची जबाबदारी अधोरेखित केली. काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, " जर सरकार हे आश्वासनांची पूर्तता करण्यात यशस्वी ठरले नाही तर त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होतो. महाराष्ट्रात त्यांनी (महाविकास आघाडी) ५, ६, १० आणि २० गॅरंटीची घोषणा करू नये. अन्यथा राज्य दिवाळखोरीत जाईल. जर रस्त्यांसाठी पैसा नसेल तर प्रत्येकजण तुमच्याविरोधात जाईल. जर हे सरकार अपयशी ठरले तर भविष्यातील पिढ्यांसाठी केवळ खराब नाव राहील. त्यांना १० वर्षे वनावासात राहावे लागेल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'एक राष्ट्र, एक निवडणूक' होणार असल्याचं जाहीर केले. त्यावर काँग्रेस अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली. मल्लिकार्जून खरगे म्हणाले, "संसदेत एकमत झाल्याशिवाय 'एक राष्ट्र, एक निवडणूक' होणे अशक्य आहे. पंतप्रधान मोदींनी जे सांगितले, ते शक्य नाही. कारण संसदेत सर्वांना विश्वासात घ्यावे लागते. तरच हे शक्य होईल."
- उल्लेखनीय बाब म्हणजे कर्नाटकमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा देण्यात येते. या योजनेचा कर्नाटक सरकारकडून पुनर्विचार करण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडं कर्नाटकचे वाहतूक मंत्री रामलिंग रेड्डी यांनी राज्यातील मोफत बस सेवा सुरुच राहणार असल्याचं गुरुवारी स्पष्ट केले.
मॉडेल लागू केल्याचा आम्हाला अभिमान-मल्लिकार्जुन खरगे यांनी जरी गॅरंटीच्या योजनेबाबत प्रतिकूल मत व्यक्त केले असले तरी कर्नाटकमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. खरगे यांच्या पत्रकार परिषदेनंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली. शिवकुमार म्हणाले, "कर्नाटकचे गॅरंटीचे मॉडेल संपूर्ण देशासाठी एक आदर्श आहे. भाजप आणि इतर पक्षही ते मॉडेल स्वीकारत आहेत. ते मॉडेल लागू केल्याचा आम्हाला अभिमान आहे."