आग्रा : प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल आज (8 ऑक्टोबर) सकाळी 2 तास बंद राहणार आहे. त्यामुळं या काळात ताज पाहण्याचा बेत असेल तर तुम्हाला नियोजनात बदल करावा लागणार आहे. सकाळी 8 वाजता ताजमहाल रिकामा केला जाईल. त्यानंतर 10 वाजेपर्यंत सर्वसामान्य पर्यटकांसाठी प्रवेश बंद राहणार आहे. यादरम्यान मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू ताजला भेट देणार आहेत. आग्रा एअरफोर्स स्टेशनवर कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय त्यांचं स्वागत करतील. दरम्यान, राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान ताजमहालच्या पूर्व आणि पश्चिम दरवाजांचं बुकिंग काउंटर बंद राहतील.
मोहम्मद मुइज्जू यांचा भारत दौरा : मोहम्मद मुइज्जू हे 6 ऑक्टोबर रोजी भारतात दाखल झाले. ते सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. मालदीवचे राष्ट्रपती त्यांच्या पत्नी साजिदा मोहम्मद यांच्यासह सकाळी 9 वाजता नवी दिल्लीहून विशेष विमानानं आग्रा येथील खेरिया विमानतळावर उतरतील. विमानतळावरून ताजमहाल पाहण्यासाठी ते कारनं व्हीव्हीआयपी पूर्व गेटवर पोहोचतील. सुमारे तासभर ते ताजमहालला भेट देणार आहेत.
11 वर्षात मालदीवचे तिसरे राष्ट्रपती आग्राला भेट देणार : मालदीवचे राष्ट्रपती ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे येत असल्याची ही पहिली वेळ नाही. मालदीवच्या राष्ट्रपतींची गेल्या 11 वर्षांत ताजमहालला भेट देण्याची ही तिसरी वेळ आहे. मालदीवचे राष्ट्रपती आवर्जून ताजमहाल पाहायला येतात. 4 जानेवारी 2013 रोजी मालदीवचे तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम ताज आग्रा येथे आले. त्यांनी ताजमहालला भेट दिली. पाच वर्षांनंतर, डिसेंबर 2018 मध्ये, मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सलेह यांनी त्यांची पत्नी फजना अहमदसोबत ताजमहालला भेट दिली.
कॅबिनेट मंत्री मालदीवच्या राष्ट्रपतींचे स्वागत करतील : मुख्यमंत्री योगी यांनी आग्रा येथे मालदीवच्या राष्ट्रपतींचं स्वागत करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलंय. योगेंद्र उपाध्याय हे मुइज्जू यांचं आग्रा येथे स्वागत करतील. यानंतर मालदीवचे राष्ट्रपती शिल्पग्रामला पोहोचतील. येथून ते ताजमहालला भेट देण्यासाठी जातील. यावेळी योगेंद्र उपाध्याय मुइज्जू यांना राज्याच्या संस्कृती आणि वारशाची माहिती देतील.
तिकीट खिडकी आणि ऑनलाइन बुकिंग राहणार बंद : एएसआय अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. राजकुमार पटेल म्हणाले की, "मालदीवचे राष्ट्रपती 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता ताजमहालला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळं ताजमहालच्या पूर्व आणि पश्चिम दरवाजातून सकाळी 8 वाजता सामान्य पर्यटकांना प्रवेश बंद केला जाईल. दोन्ही प्रवेशद्वारांचे बुकिंग काउंटरही बंद राहणार आहेत. यासोबतच सकाळी एएसआयच्या वेबसाइटवरून तिकीट बुकिंग होणार नाही. जे पर्यटक मंगळवारी सूर्योदयावेळी आत प्रवेश करतील, त्यांना 8 वाजण्यापूर्वी ताजमहालच्या बाहेर काढलं जाईल."
हेही वाचा -