मुंबई Sanjay Raut : बांगलादेश येथील हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या भारतात आल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकशाहीची जपमाळ ओढत शेख हसीना यांनी हुकूमशाही पद्धतीनं देश चालवला. त्याचा काय परिणाम झाला, याचं भारतातल्या सध्याच्या राजकीय नेत्यांनी चिंतन केलं पाहिजे, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय. त्यांनी मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधताना बांगलादेश अनागोंदीचे भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान म्हणून अपयशी : मंगळवारी सकाळी बांगलादेश प्रकरणावर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. शेख हसीना अजूनही हिंडर एयरबेसवर आहेत, याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारला "याच्यावर सरकारनं त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. सरकारला विचारल्याशिवाय त्यांचं हेलिकॉफ्टर उतरू शकत नाही. शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांशी या देशाचे उत्तम संबंध राहिले आहेत. परंतु त्या पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्या. लोकशाहीचा मुखवटा लावून जे कुणी आपल्या देशामध्ये हुकुमशाही आणू इच्छितात, तसंच स्वातंत्र्य धोक्यात आणतात. ते कुणीही असूद्यात जनता त्यांना माफ करत नाही. जनता रस्त्यावर उतरते. हिंदुस्थानसारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये उपस्थित झाली आहे. तिथेही विरोधकांचा आवाज दाबण्यात आला. निवडणुकीत घोटाळे झाले. विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं. विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या. पार्लमेंटमध्ये अनेक भयंकर कायदे करण्यात आले. जनता महागाई आणि बेरोजगारीशी लढत राहिली," अशी जहरी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा : "शिवसेना - उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱयावर आहेत. ते सोनिया गांधी, राहुल गांधी तसंच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांची भेट घेतील. तसंच ते मराठी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. 8 तारखेला उपराष्ट्रपती जगदीप धनखडांची भेट घेणार आहेत. उपराष्ट्रपतींनी त्यांना ब्रेकफास्टसाठी सहकुटुंब आमंत्रित केलं आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत ठाकरे हे चर्चा करणार आहेत. शरद पवार यांची देखील ते भेट घेणार आहेत," अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
विधानसभेला मनसेचा कोणापा पाठिंबा? : मनसेनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसे 200 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. त्यानंतर सोमवारी मनसेनं विधानसभेच्या तीन उमेदवारांची देखील घोषणा केली. यात सर्वांचे लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तिथे सध्या आदित्य ठाकरे आमदार असून, मनसे नेते संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होणार आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "आपल्याकडं लोकशाही आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्या पक्षानं त्यांचे उमेदवार उभे करावेत. कुठे काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याकडे लोकशाही आहे आणि आम्ही ती मानतो. आता लोकसभेला त्यांचा पाठिंबा मोदी-शाहांना होता तर आता विधानसभेला कोणाला आहे ते पाहावं लागेल."
भाजपावर हल्लाबोल : महाराष्ट्रात सर्व काही मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळं कोणत्याही जातीला आरक्षणाची गरज नाही, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. यावर मराठा समाजाचे नेते आक्रमक झाले. आता संजय राऊत यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. "महाराष्ट्र हा कधीकाळी सुजलाम सुफलाम आणि आनंदी होता. मुंबईसह महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीची भरभराट सुरू होती. पण, गेल्या दहा वर्षांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातून नोकऱ्यांचे प्रमाण कमी झालेलं आहे. त्याला मोदी-शाहा यांची धोरणं आणि फडणवीस यांचं विषारी राजकारण जबाबदार आहे," असं म्हणत राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला.
हेही वाचा