श्रीनगर Lok Sabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडूक 2024 ची जोरात तयारी सुरू आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपानं तर उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तर इंडिया आघाडीकडून निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याच्या निर्णयावर सध्या खल सुरू आहे. याबाबत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, की "सुरक्षेचा आढावा घेऊन निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घ्यायची की स्वतंत्रपणे, याबाबतचा निर्णय घेईल." मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आपल्या पथकासह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
निवडणूक आयोग घेणार सुरक्षेचा आढावा : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात एक पथक जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेत आहे. "आम्हाला जम्मू आणि काश्मीरमध्ये आगामी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची चिंता आहे. इथल्या राजकीय पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी मागणी केली होती. मात्र जम्मू काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेत नाही, तोपर्यंत आण्ही इथं एकत्र निवडणुका घेण्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. सुरक्षेचा आढावा घेऊन इथल्या राजकीय पक्षांसोबत सल्लामसलत करु अंतिम निर्णय घेण्यात येईल. आम्हाला जम्मू काश्मीरमध्ये लवकर निवडणुका हव्या आहेत," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
ऑनलाईन आणि रोख व्यवहारावर असेल नजर : "जम्मू काश्मीरमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग सुरक्षेचा आढावा घेणार आहे. निवडणूक शांतते पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये आगामी काळात अनुचित प्रकार रोखण्यासाठी रननीती ठरवण्यात आली आहे. ऑनलाईन आणि रोख होणाऱ्या व्यवहारावर नजर ठेवली जाणार आहे. त्यासह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरपोच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे."
स्टेट बँकेकडून मिळाला निवडणूक रोख्यांचा तपशील : सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारत निवडणूक रोखे प्रकरणाचा अहवाल देण्यास बजावलं होतं. याबाबत बोलताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोगानं स्टेट बँक ऑफ इंडियाकडून निवडणूक रोखे प्रकरणातील सगळा तपशील प्राप्त केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करुन प्रत्येक निवडणूक रोखे खरेदीची तारीख, खरेदीदाराचं नाव, आणि खरेदी केलेल्या बाँडची किंमत निवडणूक आयोगाकडं सादर करेल, असं सर्वोच्च न्यायालयात सूचित केलं आहे.
हेही वाचा :
- Cabinet Meeting : काश्मिरमध्ये महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यावर शिक्कामोर्तब, आचारसंहितेच्या तोंडावर राज्य कॅबिनेट बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
- Lok Sabha Election : भाजपाकडून लोकसभेची दुसरी उमेदवार यादी जाहीर! पंकजा मुंडेंचा वनवास संपला, महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश
- Lok Sabha Election 2024 :पंतप्रधानांच्या नावावरच निवडणुका लढवायच्या, तर शिंदे, पवारांना जास्त जागा का द्यायच्या ; 'संघा'चा भाजपा पक्षश्रेष्ठींना सवाल ?