नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : सध्या लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी जोरात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरणं सुरू आहे. त्यातच आता देशातील सगळ्यात जुना पक्ष पुन्हा एकदा मतदारांच्या दारावर जाऊन प्रचार करण्याची पद्धत अवलंबत आहे. बॅक टू बेसीक पद्धतीचा अवलंब करुन काँग्रेस 'घर घर गॅरंटी' योजना तब्बल 8 कोटी घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'डोअर टू डोअर ड्राईव्ह' राबवणार आहे.
राहुल गांधींनी वाटली हमी कार्ड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह कलपेट्टा इथल्या मरवायल भागात जाऊन घर घर गॅरंटी योजनेची हमी कार्ड वाटप केली. यावेळी त्यांनी तरुण, महिला, शेतकरी, असंघटित कामगार आणि मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्यायाच्या 5 विभागाची माहिती देणारी कार्ड वाटली. या कार्डवर पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फक्त केरळमध्ये केला जात आहे घरोघरी जाऊन प्रचार : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केरळमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी त्यांनी सामाजिक न्यायालयाची गॅरंटी मतदारांना दिली. याबाबत बोलताना केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पी विश्वनाथन म्हणाले की, “केरळ या एकमेव राज्यात मतदानाचा प्रचार घरोघरी जाऊन केला जात आहे. हा मतदारांनी स्वीकारलेला प्रचाराचा भाग आहे. केरळमधील लोकसभेच्या 20 जागांवर घरोघरी पोहोचून आम्ही प्रचार करणार आहोत. काँग्रेसनं छापलेली हमीपत्रं केरळमध्ये मल्याळम आणि इंग्रजीमध्ये छापण्यात आली. इतर राज्यांसाठी 13 प्रादेशिक भाषांमध्ये हमी कार्ड छापण्यात आले आहेत. फायदे खूप मोठे असल्यानं या मोहिमेचा मतदारांवर मोठा परिणाम होईल,"
समाजाच्या विकासासाठी घर घर गॅरंटी मोहीम महत्वाची : समाजातील सर्वस्तरात पोहोचून त्यांचा विकास करण्यासाठी घर घर गॅरंटी मोहीम महत्वाची भूमिका बजावणार आहे. काँग्रेस पक्षानं खास लोकसभा निवडणूक डोळ्यापुढं ठेऊन राहुल गांधींच्या मार्गदर्शनात ही योजना तयार केली आहे. “बेरोजगारी आजच्या तरुणांमधील सर्वात मोठा प्रश्न आहे. याबाबत काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते वारंवार स्पष्ट करत आहेत. महागाईमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महिला आणि शेतकरी संकटात आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारही असुरक्षित आहेत. त्यामुळे जात जनगणनामुळे समाजाचं खरं चित्र समोर येईल. त्यानुसार धोरणं आखता येतील. हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधील काँग्रेस सरकारनं दिलेलं वचन पूर्ण केलं आहे,” असं गुजरातचे काँग्रेस सचिव बीएम संदीप कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
हेही वाचा :
- Vasant Chavan Info : 'वंचित'चा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा; काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा दावा - Lok Sabha Election
- संजय निरुपम यांनी आज घोषणा करण्यापूर्वीच काँग्रेसनं दाखवला घरचा रस्ता, 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी - Sanjay Nirupam News
- ऐन निवडणुकीच्या काळात आयकर विभागाची कॉंग्रेसला नोटीस; ठोठावला 1700 कोटींचा दंड - Income Tax Notice Congress