नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : केंद्र सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे शेजारील देशातील अल्पसंख्यांक नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळण्याची वाट मोकळी झाली आहे. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना काढल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं ( CEC )सोमवारी लोकसभा निवडणूक 2024 चे उमेदवार ठरवण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत 90 उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी ईटीव्ही भारतला दिली आहे. त्यामुळे लवकरच भाजपाची ही दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दुसरी बैठक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दुसरी बैठक सोमवारी रात्री उशीरा दिल्लीत पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणूक 2024 च्यासाठी तब्बल 90 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीवर विचारमंथन झालं. या 90 उमेदवारांची नावं या बैठकीत अंतिम करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. "दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या बैठकीत 7 राज्यांमधील 90 उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली. याबाबत भाजपाकडून लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे," अशी माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
या राज्यातील उमेदवारांवर झाला बैठकीत 'खल' : भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणूक 2024 चे उमेदवार ठरवण्यात आले. यात मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, बिहार, हिमाचल प्रदेश आणि तेलंगाणाच्या लोकसभेच्या जागांबाबत चर्चा करण्यात आली. बिहार, तामिळनाडू आणि ओडिशामध्ये युतीच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या राज्यांतील उमेदवारांच्या याद्या अंतिम करण्यासाठी उशीर होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह मंत्री अनुराग ठाकूर, प्रल्हाद जोशी, नित्यानंद राय, सुशील मोदी, सी आर पाटील, किशन रेड्डी, मुख्यमंत्री मोहन यादव, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आदी उपस्थित होते.
हेही वाचा :