Jagannath Yatra 2024 : ओडिशातील पुरी येथं आजपासून भगवान जगन्नाथाच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला सुरुवात होत आहे. येथे दरवर्षी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा आयोजित केली जाते. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीपासून ही रथयात्रा काढली जाते. हिंदू धर्मात या रथयात्रेला विशेष स्थान आहे. रथयात्रेचं दर्शन घेतल्यानं 1000 यज्ञांचं पुण्य प्राप्त होतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा ही रथयात्रा 7 जुलैपासून सुरू होईल. ही रथयात्रा 16 जुलै रोजी संपणार आहे. देश-विदेशातील अनेक लोक या उत्सवात सहभागी होतात. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.
जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गुंडीचा मंदिरात पोहोचते. या ठिकाणीच विश्वकर्मांनी तिन्ही देवतांच्या मूर्ती बनवल्याची आख्यायिका आहे. हे जगन्नाथाचं जन्मस्थान असल्याचीही एक मान्यता आहे. येथे तिन्ही देवी-देवता सात दिवस विश्रांती घेतात. आषाढ महिन्याच्या दशमीला रथ पुन्हा मुख्य मंदिराकडे मार्गस्थ होतो. या रथयात्रेत जगन्नाथाचा रथ, देवी सुभद्राचा रथ आणि बलरामाचा रथ ओढला जातो. रथयात्रेत बलराम समोर, बहिण सुभद्राचा रथ मध्यभागी आणि भगवान जगन्नाथाचा रथ मागे असतो.
रथयात्रेचं संपूर्ण वेळापत्रक
- रविवार 7 जुलै 2024 : भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा रथ सिंहद्वार येथून निघून श्री गुंडीचा मंदिराकडे जाण्यासाठी मार्गस्थ होईल. देशाच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत सहभागी होणार असून भगवान जगन्नाथांचं आशीर्वाद घेणार आहेत. रथयात्रेच्या पहिल्या दिवशी दुपारी तीन देवी-देवतांना एक एक करून मंदिरातून बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर पुरीचे शंकराचार्य रथाचे पूजन करतील. सायंकाळी भाविक भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ ओढण्यास सुरुवात करतील.
- सोमवार 8 जुलै 2024 : 8 जुलै रोजी सकाळी पुन्हा रथ पुढे नेण्यात येईल. पुरी मंदिराच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, सोमवारी रथ गुंडीचा मंदिरात पोहोचेल. काही कारणास्तव उशीर झाल्यास मंगळवारी रथ मंदिरात पोहोचतील.
- 8-15 जुलै 2024 : भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांचे रथ श्री गुंडीचा मंदिरात राहणार आहेत. त्यांच्यासाठी येथे विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.
- 16 जुलै 2024 : या दिवशी रथयात्रा संपेल आणि तिन्ही देवी-देवता जगन्नाथ मंदिरात परततील.
- भगवान जगन्नाथाचा महाप्रसाद : भगवान जगन्नाथांना सहा वेळा महाप्रसाद दिला जातो. सात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ, चार प्रकारच्या डाळी, नऊ प्रकारच्या भाज्या आणि अनेक प्रकारच्या मिठाई जेवणात दिल्या जातात. गोड पदार्थ तयार करण्यासाठी येथे साखरेऐवजी गूळाचा वापर केला जातो. मंदिरात बटाटा, टोमॅटो, फ्लॉवरचा वापर केला जात नाही.
घरामध्ये भगवान जगन्नाथाची पूजा कशी करावी? : ज्यांच्यासाठी पुरीच्या रथयात्रेला जाणं शक्य नाही, ते घरीच भगवान जगन्नाथाची पूजा करू शकतात. भगवान जगन्नाथाला नैवेद्य दाखवा आणि त्यांच्या मंत्रांचा जप करा. घरातील पूजेच्या ठिकाणी श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती ठेवा. नैवेद्यात तुळशीच्या पानांचा अवश्य समावेश करा. हरिनाम किंवा महामंत्राचा जप करा. या दिवशी घरात पूर्ण शुद्धता ठेवावी.
हेही वाचा