चेन्नई IIT Madras : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासनं (IIT मद्रास) स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील आधुनिक इलेक्ट्रिक स्टँडिंग व्हीलचेअर विकसित केली आहे. यामुळं दिव्यांगांना या व्हीलचेअरचा फायदा होणार आहे. आज 20 मार्च रोजी आयआयटी मद्रासचे संचालक प्रोफेसर व्ही. कामकोटी यांच्या हस्ते व्हीलचेअरचं लॉन्चिंग करण्यात आलं. यावेळी IIT मद्रासचे प्राध्यापक, संशोधकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
काय आहे निओस्टँड व्हीलचेअर : आयआयटी मद्रासनं याबद्दल सांगितलं की, निओस्टँड एक कॉम्पॅक्ट स्टँडिंग व्हीलचेअर आहे. या व्हीलचेअचरचं स्टँडिंग यंत्रणेमुळं नेव्हिगेशन सोपं झालं आहे. व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती बटण दाबून सहज उभी राहू शकते. दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरवर उभं राहून विविध प्रकारची कामं या व्हीलचेअरमुळं करता येणार आहेत. हा प्रकल्प प्रोफेसर सुजाता श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आला आहे. सुजाता श्रीनिवास IIT मद्रास येथे TTK सेंटर फॉर रिहॅबिलिटेशन रिसर्च अँड डिव्हाइस डेव्हलपमेंटच्या प्रमुख आहेत. भारतातील पहिली मॅन्युअल स्टँडिंग व्हीलचेअर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आली आहे. या उपकरणाचं यशस्वीपणे व्यावसायीकरण करण्यात आलं आहे. आयआयटी मद्रासमधील स्टार्ट-अप निओमोशनद्वारे ती बाजारात उपलब्ध होणार आहे.
नवोपक्रमामुळं दिव्यांगांचं जीवन सुकर : व्हीलचेअरच्या लाँचींगप्रसंगी आयआयटी मद्रासचे संचालक प्रोफेसर व्ही. कामकोटी म्हणाले की, 'निओस्टँडची रचना पूर्णपणे वापरकर्त्यांना लक्षात घेऊन करण्यात आली आहे. ही व्हीलचेअर एक अभूतपूर्व अनुभव देणार आहे. दिव्यांग दीर्घकाळ व्हीलचेअरवर बसू शकतात. तसंच त्यांना हवं, तेव्हा आरामात उभे राहू शकतात. यामुळं इतर आरोग्य समस्यांचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होईल. हे कॉम्पॅक्ट असल्यामुळं कमी जागेतही ते सहज बसेल'. ते पुढं म्हणाले की, यामुळं कुठेही पोहोचणं सोपं होईल. आरामात बसणे, आरामात उभे राहण्याच्या दरम्यान थांबण्याचा पर्याय देखील यात उपलब्ध असेल. या नवोपक्रमामुळं दिव्यांगांचं जीवन सुकर होण्यास मदत होणार आहे.
हे वाचलंत का :