नवी दिल्ली Lok Sabha Elections : निवडणूक आयोगानं शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यावेळीही एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. यंदा 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतही सात टप्प्यातच मतदान झालं होतं. त्यामुळं संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे.
1951 मध्ये पहिल्यांदाच देशात निवडणुका : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला होता. यानंतर 1951 मध्ये पहिल्यांदाच देशात निवडणुका झाल्या. देशात पहिली लोकसभा निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 दरम्यान झाली होती. भारतातील लोकसभा निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक मानली जाते. भारतात 1951 पासून लोकसभेच्या निवडणुका होत आहेत.
पहिल्या निवडणुकीत 10 कोटी मतदारांनी केलं होतं मतदान : 5 ऑक्टोबर 1951 ते फेब्रुवारी 1952 या कालावधीत पहिली लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी 53 राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला होता. तसंच देशभरातून 1874 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. ही निवडणूक ४८९ लोकसभा मतदारसंघात पार पडली होती. पहिल्या लोकसभा निवडणुकीत (वर्ष 1951-52) आपल्या देशाची एकूण लोकसंख्या सुमारे 36 कोटी होती. त्या निवडणुकीत 10 कोटी 59 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
499 जागांसाठी मतदान : पहिल्या लोकसभा निवडणुकीत 499 जागांसाठी मतदान झालं होतं. तर 2019 मध्ये 543 जागांसाठी मतदान झालं होतं. पहिल्या निवडणुकीत 1874 उमेदवार रिंगणात होते, तर 2019 मध्ये 8054 उमेदवारांनी नशीब आजमावलं होतं. त्यात 7 हजार 322 पुरुष तसंच 726 महिला उमेदवार होत्या. 6 तृतीयपंथी उमेदवारांनीही गेल्या निवडणुकीत नशीब आजमावलं होतं.
पहिली लोकसभा निवडणूक चार महिने चालली : देशातील पहिली लोकसभा निवडणूक तब्बल चार महिने चालली होती. पहिल्या लोकसभा निवडणुकीत एकूण 53 पक्षांनी निवडणूक लढवली होती. त्यात 14 राष्ट्रीय पक्ष, 39 प्रादेशिक पक्षांचा समावेश होता. तर 2019 च्या निवडणुकीत 673 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात 7 राष्ट्रीय पक्ष आणि इतर प्रादेशिक पक्ष होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं जिंकली पहिली निवडणूक : पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 1,32,560 मतदान केंद्रे तयार करण्यात आले होते. त्यावेळी एकूण 489 निवडणूक अधिकारी कर्तव्यावर होते. त्यावेळी ही निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं जिंकली होती. निवडणुकीनंतर जवाहरलाल नेहरू हे पहिले निवडून आलेले पंतप्रधान होते. काँग्रेसला त्यावेळी इतर प्रमुख पक्षांच्या तुलनेत चौपट मते मिळाली होती. काँग्रेसला तब्बल 364 जागा मिळाल्या होत्या. सीपीआयला 16 जागा मिळाल्या होत्या. टक्केवारीचा विचार केला तर 45 टक्क्यांहून अधिक लोकांनी काँग्रेसला मतदान केलं होतं.
हे वचालंत का :