चंदीगड CM Manoharlal Khattar Resigned : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हरियाणात आता मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणा भाजपा आणि जेजेपी यांची युती तुटल्यानं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीत जागा वाटपाची चर्चा फिस्कटल्यानं ही युती तुटल्याची चर्चा सुरू आहे.
दुष्यंत चौटाला यांनी घेतली जे पी नड्डांची भेट : सोमवारी हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोघांत जवळपास अर्धा तास लोकसभा निवडणूक 2024 च्या सीट वाटपावरुन चर्चा झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत भाजपा आणि जेजेपी यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. जागा वाटपाची चर्चा फिस्कटल्यानं भाजपा आणि जेजेपी यांच्यातील युती तुटल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिला राजीनामा : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडं सुपूर्द केला आहे. जेजेपीसोबतची युती तुटल्यानंतर भाजपा अपक्ष आमदारांसह हरियाणात सरकार स्थापन करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपाचे आमदार राजभवनात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा आता हरियानात अपक्ष आमदारांच्या मदतीनं सरकार स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राजभवनातील कॉन्फरन्स रूममध्ये शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जेजेपीसोबतची युती तुटल्यानं विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले की, "2019 मध्ये सरकार स्थापन करण्याच्या स्वार्थापोटी जेजेपी आणि भाजपा हे मित्र बनले होते. आता युती तुटल्यानं आणखी एक करार झाला आहे."
हेही वाचा :