प्रयागराज Gyanvapi Case : ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याच्या अधिकाराला मुस्लिम पक्षानं विरोध केला होता. या संदर्भात मुस्लिम पक्षानं वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणावर आज सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मोठा निर्णय दिलाय.
न्यायालयाचा निर्णय काय : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मुस्लिम पक्षाच्या दोन्ही याचिका फेटाळताना व्यासजींच्या तळघरात पूजा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचिका फेटाळल्यानंतर आता मुस्लिम बाजू सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते. वाराणसी जिल्हा न्यायाधीशांनी व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यासाठी हिंदू पक्षाला परवानगी दिली होती. याला विरोध करत मुस्लीम पक्षानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वाराणसी जिल्हा न्यायाधीशांनी परवानगी दिलेली पूजा सुरुच राहील, असं उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय. ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, "अलाहाबाद उच्च न्यायालयानं अंजुमन व्यवस्थांच्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. म्हणजे जी पूजा चालू होती, त्याच पद्धतीनं चालू राहील. ते सुप्रीम कोर्टात गेले तर तिथंही आम्ही आमचं म्हणणं मांडू." अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठानं ज्ञानवापी मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीनं दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी केली. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता.
व्यासजींच्या तळघरात पूजेवर केव्हा होती बंदी : डिसेंबर 1993 पासून ज्ञानवापी कॅम्पसमधील बॅरिकेड असलेल्या भागात प्रवेशावर बंदी होती. तेव्हापासून व्यासजींच्या तळघरात पूजा होत नव्हती. राग-भोगासह इतर विधीही थांबले होते. ब्रिटीशांच्या काळातही तिथं पूजा होत होती, असा दावा हिंदू पक्षानं न्यायालयात केला होता. तळघरात हिंदू उपासनेशी संबंधित वस्तू आणि अनेक प्राचीन शिल्पं आणि धार्मिक महत्त्व असलेल्या इतर वस्तू आहेत.
काय आहे व्यासजींचं तळघर : ज्ञानवापी मशीद संकुलात चार तळघर आहेत. त्यापैकी एक सध्या व्यास कुटुंबाच्या ताब्यात आहे. जे तिथं राहात होते. त्याला व्यासजींचं तळघर म्हणतात. ज्ञानवापी मशीद परिसराच्या दक्षिणेला व्यासजींचं तळघर आहे. पुजारी सोमनाथ व्यास 1993 पर्यंत तिथं पूजा करत होते. त्यानंतर तत्कालीन सरकारच्या सूचनेवरुन अधिकाऱ्यांनी तळघर बंद केलं. तेव्हापासून तिथं पूजा होत नाही.
हेही वाचा :