भोपाळ : जिद्द, धैर्य आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल तर आपण जगाला आश्चर्य वाटेल, असे काम करू शकतो. हे मध्य प्रदेशमधील पोलीस कर्मचाऱ्यानं दाखवून दिलं आहे. हवालदार सुनील यादव हे दातात हुक अडकवून 5 कार सहजरित्या ओढतात.
सुनील यादव हे पोलीस महानिरीक्षक कार्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. ते 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडमध्ये आपलं कौशल्य दाखविणार आहेत. त्यासाठी ते रोज मैदानावर सराव करत आहेत. त्यांनी दातांमध्ये दोरीचे हूक अडकवून 5 कार ओढल्याचे कौशल्य विकसित केलं आहे. भविष्यात अशाच पद्धतीनं दातांनी 8 कार ओढण्याचे त्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी ते मैदानात परिश्रम करत आहेत.
ग्वाल्हेरचा बाहुबली अशी नवी ओळख- केवळ दातांमध्ये दोरी ओढून पाच कार ओढण्यात येत असल्यानं अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यांची अफाट ताकद पाहून त्यांना 'ग्वाल्हेरचा बाहुबली' म्हटलं जाऊ लागलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या मुख्य कार्यक्रमात त्यांना आठ कार दातानं ओढून दाखविण्याची इच्छा आहे. त्यासाठी पोलीस हवालदार यादव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यासाठी ते मैदानावर रोज तयारी करत आहेत. विशेष म्हणजे अफाट ताकदीचं प्रदर्शन दाखविणारे सुनील यादव हे शाकाहारी आहेत. पोलीस हवालदार यादव हे दूध आणि सुकामेवाचा आहार घेऊन स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतात.
पंजाबच्या स्टंटमनकडून मिळाली प्रेरणा दातांनी पाच कार ओढण्याचं कौशल्य कसं शिकले, यावर त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले , "यूट्यूबवर पंजाबमधील एका स्टंटमॅनला दातानं कार ओढताना पाहिलं होतं. पंजाबमधील हा तरुण स्टील मॅनच्या नावानं प्रसिद्ध आहे. त्याचे स्टंट पाहून असेच काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला एक, त्यानंतर चार आणि आता 5 कार एकमेकांना ओढून त्यांनी सर्वांना अचंबित केलं आहे. पुढे सुनील यादव म्हणाले, " पंजाबमधील स्टंटमॅन इतरही अनेक प्रकारचे स्टंट करतो. यामध्ये छातीवर दगड ठेवून फोडणे, अंगावरून बाईक जाऊ देणे, असे अनेक स्टंट आहेत".
- गृहविभागाकडून मिळतेय सहकार्य- सुनील यादव म्हणाले, "माझ्या कार ओढण्याच्या सरावाकरिता गृहविभागाकडून सर्व प्रकारची मदत मिळत आहे. सरावासाठी वेळ देण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य परेडमध्ये सहभागी होणार आहे. आणि ते दातांनी 5 गाड्या ओढण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत".