अहमदाबाद Drugs seized : भारतीय तटरक्षक दलानं गुजरातच्या किनारपट्टीवर पाकिस्तानी बोटीतून 600 कोटी रुपयांचे 86 किलो अमली पदार्थ जप्त केले. भारतीय तटरक्षक दल, दहशतवाद विरोधी पथक (ATS) तसंच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. बोटीतून 14 जणांना अटक करण्यात आली आहे. अरबी समुद्रात ही कारवाई गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या संयुक्त समन्वयानं रात्रभर ही कारवाई करण्यात आली.
बोटीतून 14 जणांना अटक : मात्र, पाकिस्तानी बोटीतून कोणतं ड्रग्ज जप्त करण्यात आलं, हे तटरक्षक दलानं अद्याप उघड केलेले नाही. ही कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाची जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली होती. आयसीजी जहाज राजरतननेही या कारवाईत भाग घेतला. जहाजाच्या विशेष पथकानं संशयास्पद बोटीवर चढून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असल्याची पुष्टी केली. पाकिस्तानी बोटीवर असणाऱ्या 14 जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं.
एटीएस आणि एनसीबी यांची संयुक्त कारवाई : एटीएस आणि एनसीबी यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान, तस्करांनी अटक टाळण्याच्या प्रयत्नात एटीएस अधिकाऱ्यांला बोटखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्यानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. गेल्या दोन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ सुरक्षा यंत्रणा भारतीय पाण्याच्या आत शोध मोहीम राबवत असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपींना चौकशीसाठी पोरबंदर येथे आणण्यात येत आहे.
गुजरात आणि राजस्थानमध्ये छापे : दुसरीकडं, गुजरात आणि राजस्थानमध्ये मेफेड्रोन या औषधाची निर्मिती करणाऱ्या चार युनिटवर छापे टाकून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे शुक्रवारी या युनिट्सवर संयुक्तपणे छापा टाकला. या छाप्यात 230 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आलं आहे.
124 किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त : एटीएसनं 22 किलो मेफेड्रोन आणि 124 किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे. त्याची किंमत सुमारे 230 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितले की, "अहमदाबादचे मनोहर लाल एनानी आणि राजस्थानचे कुलदीपसिंग राजपुरोहित यांनी मेफेड्रोन तयार करण्यासाठी युनिट्स स्थापन केल्याची माहिती एटीएसला मिळाला होती. त्यानंतर छापा टाकण्यात आला."
राजपुरोहितसह एनानीला अटक : राजपुरोहितला गांधीनगर येथून तर एनानीला सिरोही येथून अटक करण्यात आली. एनानी यांनी अशाच एका प्रकरणात सात वर्षे तुरुंगवास भोगला आहे. त्याला 2015 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयानं (DRI) मेफेड्रोनच्या निर्मितीच्या आरोपाखाली अटक केली होती. आरोपी किती दिवसांपासून अमली पदार्थांचं उत्पादन करत होता? याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या टोळीमध्ये कोण कोण आरोपी सामील आहेत? याचाही शोध घेतला जात आहे.
हे वाचलंत का :
- निवडणुकीच्या रणधुमाळीत अमली पदार्थ विरोधी पथकाची 'मायानगरी'त मोठी कारवाई; 1 कोटी 34 लाखांचे ड्रग्ज जप्त, सात जणांना अटक - Drugs Seized
- गोवा एनसीबीकडून आंतरराज्य तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, नायजेरियाच्या मुख्य सूत्रधाराला पत्नीसह अटक - Goa NCB
- नागपूर विमानतळावर कस्टम्सकडून 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक - Narcotics Case Nagpur