पणजी Goa Speaker Allegation : गोव्यात भाजपा सरकारमधील राजकारण चांगलंच पेटल्याचं स्पष्ट झालं आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश तावडकर यांनी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गौडे यांचा राजीनामा मागितला आहे. मंत्री गोविंद गौडे यांनी 'विशेष अनुदान योजनेत' गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं आपल्याच मंत्र्याविरोधात विधानसभा अध्यक्षांनी थेट भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष अनुदान योजना गैरप्रकार : "कला आणि संस्कृती विभागानं अनेक संस्था स्थापन केलेल्या कुटुंबांना अनुदान जाहीर केलं आहे. त्यासाठी विशेष अनुदान योजना राबवण्यात आली. मात्र या योजनेत अनुदान जाहीर केलं ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलंच नाही. त्यामुळं अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे." असं विधानसभा अध्यक्षांनी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
मंत्री गोविंद गौडे यांनी राजीनामा द्यावा : विधानसभेचे अध्यक्ष रमेश तावडकर यांनी विशेष अनुदान योजनेत गैरप्रकाराचा आरोप केल्यानंतर गोव्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. रमेश तावडकर यांनी गोविंद गौडे यांच्यावर आरोप केल्यानंतर विरोधकांनी मंत्री गोविंद गौडे यांचा राजीनामा मागितला आहे. रमेश तावडकर यांनीही "मंत्र्यांचा बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही. मी प्रथमच माझ्या सरकारमधील एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या घटनेचा साक्षिदार झालो आहे. मला याचं वाईट वाटत आहे. असं होऊ नये, मी ते केव्हाच खपवून घेणार नाही," असं स्पष्ट केलं.
मंत्र्यांवर कारवाई अटळ आहे : "विशेष अनुदान योजनेत गैरप्रकार केल्यानं गोविंद गौडे यांच्यावर कारवाई अटळ आहे. कला आणि संस्कृती मंत्रालयातील निधीचा गोविंद गौडे यांनी गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्याकडं गंभीरपणानं लक्ष देण्याची गरज आहे," असंही रमेश तावडकर यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष रमेश तावडकर यांनी आरोप केलेल्या कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गौडे यांच्यावर या अगोदरही 90 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मंत्र्यांनी पद सोडून चौकशीला सामोरं जावं : गोव्याच्या कला आणि संस्कृती मंत्र्यांवर विधानसभा अध्यक्षांकडूनच भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळं विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मंत्री गोविंद गौडे यांचा राजीनामा मागितला आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबत बोलताना सांगतिलं की, "मी अनेकदा हा मुद्दा मांडला आहे, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. सरकारनं तातडीनं या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. निष्पक्ष चौकशीसाठी मंत्री गोविंद गौडे यांनी मंत्रिपद सोडून चौकशीला सामोरं जावं," तर अमित पाटकर यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी गोविंद गौडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी कला अकादमीच्या नुतनीकरणात 90 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मात्र भाजपा एका भ्रष्ट मंत्र्याला संरक्षण देते," असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
हेही वाचा :