नवी दिल्ली PM Narendra Modi on ED : मोदी सरकार हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षांचं सरकार पाडत असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करत आहेत. ईडी, सीबीआयचा धाक दाखवून केंद्र सरकारनं विविध राज्यातील सरकार पाडले असल्याचा आरोपही विरोधक करत आहेत. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलंय. ईडीनं नोंदवलेले सर्वाधिक (९७ टक्के) गुन्हे अशा व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध आहेत, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळं विरोधकांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय.
पंतप्रधानांनी केलं ईडीचं कौतुक : विरोधी पक्षांचा आरोप फेटाळून लावताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "ईडीनं नोंदवलेले सर्वाधिक (९७ टक्के) गुन्हे अशा व्यक्ती आणि संस्थांवर आहेत, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळं प्रामाणिक लोकांना घाबरण्याची गरज नाही. पण भ्रष्टाचारात गुंतलेल्या लोकांना पापाची भीती वाटते." पंतप्रधानांनी ईडीचंही कौतुक केलं आणि सांगितलं की, "2014 मध्ये केंद्रात पदभार स्वीकारल्यापासून या केंद्रीय एजन्सीनं भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 2014 साली ईडीनं फक्त 5 हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. ईडीला कारवाई करण्यापासून कोणी रोखले नाही."
भ्रष्ट लोकांना पापाची भीती : "किती विरोधी नेते तुरुंगात आहेत? मला कोणी सांगत नाही. भ्रष्ट लोकांना पापाची भीती असते. प्रामाणिक माणसाला कशाचीही भीती नसते. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा ईडीनं माझ्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकलं. देशानं हे समजून घेतलं पाहिजे की ईडीच्या केवळ 3 टक्के प्रकरणांमध्ये राजकारण्यांचा समावेश आहे आणि 97 टक्के प्रकरणे राजकारणाशी संबंधित नसलेल्या लोकांवर दाखल आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
राम मंदिर विरोधकांसाठी राजकीय मुद्दा : पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या आणि बेनामी संपत्ती निर्माण करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात आलंय. भ्रष्टाचारानं देश उद्ध्वस्त केलाय. आता भ्रष्टाचार पूर्ण ताकदीनं संपवायला हवा. अटकेसोबतच ईडीनं रोकडही जप्त केली आहे." राम मंदिराच्या मुद्द्यावर मोदी म्हणाले, "राम मंदिर हे विरोधकांसाठी राजकीय शस्त्र होतं. आता राम मंदिर बांधलं आहे, त्यामुळं हा मुद्दा त्यांच्या हाताबाहेर गेला आहे."
राज्यांच्या विकासात अडथळा आणत नाही : "प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य दिलं पाहिजे, हे भाजपाचं धोरण आहे. प्रादेशिक आकांक्षा नाकारुन विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. मी अनेक वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री राहिलो. मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा इतक्या वर्षांचा अनुभव असलेला मी देशातील पहिलाच पंतप्रधान आहे. त्यामुळं मला राज्यांना केंद्र सरकारकडून काय अपेक्षा असतात? काय समस्या येतात? याची मला जाणीव आहे. मी या सगळ्या समस्यांचा सामना केलाय. त्यामुळं कोणत्याही राज्याच्या विकासात अडथळा येऊ देत नाही. मी सर्व राज्यांना मदत करायला तयार आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- गेल्या 50-60 वर्षांत काँग्रेसला करता आलं नाही ते मोदींनी केलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Lok Sabha Election 2024
- 'मोदींमुळंच राम मंदिर झालं', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर स्तुतीसुमनं; उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच संपवली पत्रकार परिषद - Raj Thackeray
- युक्रेनमधून 20 हजार मुलं परत आली, ही मोदींची गॅरंटी : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर - EAM S Jayshankar