नवी दिल्ली Viksit Bharat Messages : आदर्श आचारसंहिता लागू होऊनही सरकारच्या उपक्रमांवर प्रकाश टाकणाऱ्या 'विकसित भारत' संदेशांवर निवडणूक आयोगाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावरुन निवडणूक आयोगानं 'विकासित भारत' संदेश तत्काळ थांबण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून अहवाल मागवला : निवडणूक आयोगानं गुरुवारी, 21 मार्च रोजी इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला व्हॉट्स ॲपवर पाठवण्यात येणारे 'विकसित भारत' संदेश त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगानं तत्काळ इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (Ministry of Electronics and Information Technology) अहवाल मागवला आहे. निवडणूक आयोगानं सांगितलं की, सार्वत्रिक निवडणुका 2024 ची घोषणा होऊनही नागरिकांच्या फोनवर असे, संदेश पाठवले जात असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाला मिळाल्या आहेत. त्यामुळं याप्रकरणी सरकारला निर्देश दिले आहेत.
आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रासह लाखो भारतीयांना 'विकसित भारत'चा व्हॉट्स ॲप संदेश प्राप्त होतो. व्हॉट्स ॲप मेसेजमध्ये सरकारी योजना तसंच धोरणांशी संबंधित नागरिकांकडून प्रतिक्रिया आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. पीडीएफ फाइलमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, मातृ वंदना योजना इत्यादी सरकारी योजनांचा उल्लेख आहे. विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या 'विकसित भारत' संदेशाला आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसनं पंतप्रधानांच्या संदेशासोबत जोडलेल्या पीडीएफ फाइलला 'राजकीय प्रचार' म्हटलं आहे. तसंच तृणमूलसह काँग्रेसनं याप्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडं केली आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात आचारसंहिता भंगाच्या दोन तक्रारी : निवडणूक आयोगानं 16 मार्च रोजी 7 टप्प्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांतील 102 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारीही दाखल होऊ लागल्या आहेत. पंतप्रधान मोदींविरोधात 24 तासांत दोन तक्रारी आयोगाकडं दाखल झाल्या आहेत.
हे वाचलंत का :