नवी दिल्ली CP Radhakrishnan News - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील सहा राज्यांकरिता नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. तर पुद्दुचेरीला नवीन नायब राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत.
सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. ते सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही आहे. राष्ट्रपती भवनकडून जारी केलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींनी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारून त्यांच्या जागी गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती केली. गुलाबचंद कटारिया हे सध्या आसामचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
कोणाकडे कोणत्या राज्यांची राज्यपाल म्हणून जबाबदारी- राष्ट्रपतींनी संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. तर जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. त्याचबरोबर त्यांच्याकडे मणिपूरची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. तर ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. हरिभाऊ किशनराव बागडे यांच्यावर राजस्थानचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर रमण डेका यांची छत्तीसगड आणि सी. एच. विजयशंकर यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कैलाशनाथ यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या झाल्या असल्या तरी त्या राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्या नियुक्त्या लागू होणार आहेत.
शालेय जीवनापासून आरएसएसबरोबर काम- सी. पी. राधाकृष्णन हे वयाच्या 16 व्या वर्षापासून म्हणजे 1973 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाबरोबर काम करत आहेत. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात झाला. 1998 ला कोईम्बतूर बॉम्बस्फोटानंतर त्यांनी भाजपाच्या तिकिटावर विजय मिळविला. 2004 मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडली. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या संघटन बांधणीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. 2004 च्या निवडणुकीसाठी त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमबरोबर भाजपाचे संबंध दृढ करण्यासाठी पुढाकार घेतला.
दक्षिण भारतामधील वजनदार नेते अशी ओळख- दक्षिण भारत आणि तामिळनाडूतील भाजपाच्या सर्वात ज्येष्ठ आणि वजनदार नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. 2019 च्या निवडणुकीसाठी त्यांना पुन्हा एकदा कोईम्बतूरमधून भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती. हायकमांडने त्यांची केरळ भाजपा प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. ते 2016 ते 2019 पर्यंत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) अंतर्गत येणाऱ्या ऑल इंडिया कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते.
हेही वाचा-