लखनऊ Constable Opened Fire On Police : दोन भावात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर भांडण करणाऱ्या भावांनी गोळीबार केल्यानं मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे या भावांनी पोलिसांवर गोळीबार करुन त्यांचं वाहन पेटवून दिलं. कसाबसा जीव मुठीत घेऊन पळालेल्या पोलिसांचे जीव वाचले. ही घटना झाशीच्या नवाबाद परिसरातील बजरंग कॉलनीत घडली. सुरेंद्र आणि योगेंद्र अशी त्या पोलिसांच्या पथकावर गोळीबार करणाऱ्या भावांची नाव आहेत. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी गोळीबार करणाऱ्या पोलीस हवालदार योगेंद्रला अटक केली, तर त्याचा भाऊ सुरेंद्र फरार होण्यात यशस्वी झाला.
भावात सुरू होता संपत्तीवरुन वाद : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेंद्र आणि सुरेंद्र हे दोन भाऊ झाशीच्या नवाबाद पोलीस ठाण्याच्या परिसरातील बजरंग कॉलनीत राहतात. सुरेंद्र हा बांदा इथं हवालदार आहे. गुरुवारी रात्री उशिरा 112 क्रमांकावर बजरंग कॉलनीत योगेंद्र आणि सुरेंद्र या दोन भावात मालमत्तेवरून मोठा वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे पोलीस जवान त्यांच्या 'पीआरव्ही 0364' वाहनातून घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना पाहताच दोन्ही भाऊ प्रचंड संतापले. या दोन्ही भावांनी त्यांच्या परवाना असलेल्या रायफलमधून पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. कसाबसा पीआरव्ही पथकानं जीव मुठीत घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. यावेळी संतापलेल्या या दोन्ही आरोपींनी पोलिसांची गाडी पेटवून दिली. जीव मुठीत घेऊन पळालेल्या पोलिसांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
पोलीस अधीक्षकांनी फौजफाट्यासह गाठलं घटनास्थळ : भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस पथकावर दोन भावांनी गोळीबार केल्याची माहिती वाऱ्यासारखी राज्यभर पसरली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश एस यांनी विविध पोलीस पथकांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश एस यांनी गोळीबार करणारा पोलीस शिपाई सुरेंद्र याला बेड्या ठोकल्या. मात्र त्याचा भाऊ योगेंद्र हा घटनास्थळावरुन फरार झाला. मात्र पोलीस अधीक्षकाच्या पथकानं त्याला मेडिकल कॉलेजच्या पाठीमागील जंगलातून पाठलाग करुन अटक केली. विशेष म्हणजे पाठलाग करणाऱ्या पोलीस जवानांवर सुरेंद्र यानं गोळीबार केला. या चकमकीदरम्यान योगेंद्रच्या पायाला गोळी लागली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
गोळीबार करुन पोलीस वाहन जाळलं : दोन्ही भावंडांनी पोलीस पथकावर गोळीबार करुन पोलिसांचं सरकारी वाहन जाळलं. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश एस यांनी "दोन भावांमध्ये झालेल्या वादाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळ गाठलं. यावेळी दोन्ही भावांनी मिळून पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांची सरकारी गाडी जाळण्यात आली. यातील सुरेंद्र हा आरोपी पोलीस शिपाई आहे. त्याबाबतची माहिती त्याच्या जिल्हा पोलीस प्रमुखाला देण्यात आली आहे. गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्यात येत आहे," अशी माहिती दिली. विशेष म्हणजे यापूर्वी उत्तर प्रदेशातील गुंड विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गोळीबार केल्यानं गुंडांच्या गोळीबारात 6 पोलिसांचा मृत्यू झाला. ही घटना 2 जुलै 2020 मध्ये कानपूरजवळच्या बिकारू गावात घडली होती.
हेही वाचा :
- रंगेहात सापडलेल्या पतीला चोप देऊन त्याच्या मैत्रीणीला ठेवलं बांधून, पोलिसांनी केली महिलेची सुटका - husband found red handed
- 'ड्रिमगर्ल'च्या मधाळ बोलण्याला भुलला उच्चपदस्थ अधिकारी ; अलवरच्या 'स्वामी'नं केलं ब्लॅकमेल - Fraud By Posing As A Girl
- विकास दुबेला अटक की आत्मसमर्पण? खुलासा करा; अखिलेश यादव यांची सरकारकडे मागणी