छत्तीसगड Congress Leader Suicide : छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं संपूर्ण कुटुंबासह विष प्राशन केलं. या घटनेनंतर लगेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बिलासपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंबानं विष प्राशन करून आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलिसांनी त्यांचे घर सील केलं असून पुढील तपास सुरू केला.
चौघांचा मृत्यू : समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय -66 वर्षे), त्यांची पत्नी दिनेश नंदानी यादव (वय -55 वर्षे), मुलगा नीरज यादव (वय- 28 वर्षे) आणि दुसरा मुलगा सूरज यादव (वय- 25 वर्षे) या सर्वांनीच शुक्रवारी विष प्राशन केलं होतं. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत या सर्वांना बिलासपूर येथील रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, या सर्व चौघांचा मृत्यू झालाय. या सर्वांनी 30 ऑगस्ट रोजी एकत्र विष प्राशन केलं होतं.
'या' कारणामुळं केली आत्महत्या? : मिळालेल्या माहितीनुसार, पंचराम यादव हे काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव होते. ते कंत्राटदाराचं काम करत होते. त्यांनी दोन बँकांकडून कर्ज घेतलं होतं. कर्ज फेडता न आल्यामुळं त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पंचराम यादव यांना ह्रदयाशी निगडीत आजारही होता. त्यांचा मुलगा निरज यादव हा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता, तर दुसरा मुलगा वडिलांप्रमाणे कंत्राटदाराचं काम करत होता.
दरम्यान, आत्महत्या का केली याचं अधिकृत कारण अद्याप समजू शकलं नाही. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर काँग्रेस पक्ष आणि स्थानिकांनी शोक व्यक्त केला.
हेही वाचा
- जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक, राज्यातील केवळ 'या' नेत्याचा समावेश - congress 40 star campaigners
- बंगालमध्ये यावर्षीचा पावसाळा ममता बॅनर्जींसाठी अस्तित्वाची लढाई ठरू शकतो - MAMATA ARMAGEDDON MOMENT
- महादेव बेंटींग अॅप प्रकरण ; आता सीबीआय करणार महादेव बेटींग प्रकरणाचा तपास, भूपेश बघेल यांच्या अडचणीत वाढ - Mahadev Online Betting App Case