भोपाळ -मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आदिवासीबहुल भागातील बोदल कचर गावात आदिवासी कुटुंबातील ८ जणांची कुऱ्हाडीनं वार करून हत्या करण्यात आली. ही भीषण हत्या केल्यानंतर घरातील कर्त्यापुरुषानं आत्महत्या केली. हत्येचे कारण समजू शकले नाही.
हत्येचे कारण काय असावे? एकाच कुटुंबातील ८ जणांची हत्या झाल्यानं बोदल कचर गावात दहशतीचे वातावरण आहे. या हत्याकांडाबद्दल ग्रामस्थ तर्कवितर्क लावत आहेत. कुटुंबप्रमुख हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता, अशी चर्चा आहे. रागाच्या भरात त्यानं कुटुंबातील सर्वांची हत्या केल्याचेही बोललं जात आहे. मात्र पोलिसांनी याबाबत दुजोरा दिलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार आरोपीनं त्याचे आई-वडील आणि मुलांची हत्या केली. हत्याकांडाची माहिती समजताच माहुलझीर पोलीस आणि छिंदवाडा येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
आरोपीला मानसिक विकार- आरोपीनं सर्वप्रथम पत्नी, त्यानंतर बहीण-आई यांची हत्या केली. निर्दयीपणानं लहान मुलांचीही हत्या केली.आरोपीनं सर्वप्रथम कुऱ्हाडीनं पत्नीची हत्या केली. त्यानंतर आई, बहीण, वहिनी आणि मुलांनाही ठार केले. आरोपीनं १० वर्षाच्या मुलावरही हल्ला केला. पण, तो पळून गेल्यानं त्याचे प्राण वाचले आहेत. त्या मुलानं या हत्याकाडांची शेजाऱ्यांना माहिती दिली. मुलाच्या माहितीनुसार हे हत्याकांड मध्यरात्री तीन वाजता घडले. या भयानक हत्याकाडांचा व्हिडिओ समोर आला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष खत्री म्हणाले, " हत्याकांडाबाबत सविस्तर तपास केला जात आहे. 21 मे रोजी आरोपीचा विवाह झाला होता. प्राथमिक माहितीनुसार आरोपीला मानसिक विकार होता."
आत्महत्या हा उपाय नाही- जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील अथवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर कोणीतरी नेहमी ऐकण्यासाठी उपलब्ध असते. तुम्ही स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची हेल्पलाइन - 9152987821 वर कॉल करा. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत उपलब्ध आहे.
हेही वाचा-