तिरुअनंतपूरम Bank Of Maharashtra Scam : बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्यावर डल्ला मारणाऱ्या माजी शाखा व्यवस्थापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केरळचा हा आरोपी तेलंगाणात असल्याची माहिती मिळाल्यानं तेलंगाणा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून केरळ पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मधा जयकुमार असं या ग्राहकांच्या सोन्यावर डल्ला मारणाऱ्या माजी शाखा व्यवस्थापकाचं नाव आहे. मधा जयकुमार यानं वडकारा शाकेतून हे सोनं पळवलं होतं.
ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या जागी बनावट सोनं : तामिळनाडूतील मेट्टुपलायम पाथी इथ राहणारा मधा जयकुमार हा बँक ऑफ महाराष्ट्रच्या वडकारा शाखेचा व्यवस्थापक होता. ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या जागी त्यानं बनावट सोनं ठेवून सगळ्या सोन्यावर डल्ला मारला. नव्यानं पदभार घेतलेल्या व्ही इर्शाद यांनी ही बाब उघडकीस आणली. त्यामुळे त्यांनी तत्काळ वडकारा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. मधा जयकुमार हा गेल्या तीन वर्षांपासून वडकारा शाखेचा व्यवस्थापक होता. त्याची जुलैमध्ये एर्नाकुलम येथील पलारीवट्टम शाखेत बदली झाली. मात्र तो पदभार स्वीकारण्यात अयशस्वी ठरला.
तब्बल 26 किलो सोन्यावर मारला डल्ला : बँक ऑफ महाराष्ट्रच्या वडकारा शाखेतील तब्बल 42 खात्यातील सोन्यावर मधा जयकुमार यानं डल्ला मारला. हे सोनं ग्राहकांनी 13 जून ते 6 जुलै 2024 या कालावधित तारण ठेवलं होतं. तब्बल 16 कोटी रुपयाच्या किमतीचं सोनं मधा जयकुमार यानं चोरल्यानं मोठी खळबळ उडाली. ही बाब उघड झाल्यानंतर मधा जयकुमार हा फरार झाला.
तेलंगाणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या : मधा जयकुमार हा फरार झाल्यानंतर त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. यावेळी केरळ पोलिसांनी इतर राज्यात तो पळाल्याचा संशय व्यक्त केल्यानं त्याचा शोध इतर राज्यातही घेतला जात होता. त्यामुळे तेलंगणा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सध्या मधा जयकुमार हा तेलंगाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. केरळ पोलीस अधिकाऱ्यांचं पथक त्याला अटक करण्यासाठी तेलंगणाला रवाना झाल्याची माहिती ईटीव्ही भारतला सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी वडकारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुमार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- बँकेच्या लॉकरमधून 5 कोटी सोन्याच्या चोरीतील आरोपींना सिनेस्टाईलनं अटक, नाशिक पोलिसांची कामगिरी - Nashik Crime News
- सोनं विकायला गेले अन् दोन भाऊ बेपत्ता झाले; मुंबईत सराफा व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा लावला 'चुना' - Gold Theft In Mumbai
- Police Action On Thief : ओडीसातील सराईत चोरट्याच्या नागपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 951 ग्राम सोन्याचे दागिने जप्त