पलामू Child hostage for not repaying loan in Garhwa : झारखंडमधील गढवा येथील भवनाथपूर भागात कर्जाची परतफेड न केल्यानं एका मुलाला 14 दिवस ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी बँक मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला निलंबितही करण्यात आलं आहे. तसंच कंपनीनं या संपूर्ण प्रकरणाबाबत झारखंडचे डीजीपी आणि गढवा एसपी यांना पत्रही लिहिलंय. एकीकडं ही घटना बँक व्यवस्थापकाच्या वैयक्तिक पातळीवर घडल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. तर दुसरीकडं सीडब्ल्यूसीनंही या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.
मुलाचे डोळे आणि किडनी विकण्याची दिली धमकी : गढवाच्या भवनाथपूर भागात एका मायक्रो फायनान्स कंपनीच्या मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांनी कर्जाची परतफेड न केल्यानं एका मुलाला ओलीस ठेवलं होतं. यादरम्यान मुलाला खरकटी भांडी आणि दारूच्या बाटल्या उचलायला लावल्या. याशिवाय मुलाचे डोळे आणि किडनी विकण्याची धमकीही देण्यात आली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी बँक मॅनेजरला अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे.
अंतर्गत चौकशी सुरू : या संपूर्ण प्रकरणात गढवा पोलिसांनी विशेष टीम तयार केली असून, तपासाची जबाबदारीही बालकल्याण समितीकडं देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर कारवाई करत कंपनीनं आरोपी बँक मॅनेजरला तत्काळ निलंबित केलं असून त्याच्याविरुद्ध अंतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली आहे. जे काही घडलं ते बँक व्यवस्थापकाच्या वैयक्तिक पातळीवर घडल्याचं कंपनीच्या कायदेशीर टीमकडून सांगण्यात आलंय.
कंपनी RBI कडं नोंदणीकृत आहे, जे काही घडलं ते वैयक्तिक पातळीवर घडलंय, याप्रकरणी बँक मॅनेजरला निलंबित करण्यात आलं आहे - अश्विनीकुमार पारीख, सदस्य, मायक्रो फायनान्स कंपनी
नेमकं काय आहे प्रकरण? : गढवा येथील भवनाथपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रोहनिया येथे राहणाऱ्या एका महिलेनं मायक्रो फायनान्स कंपनीकडून 40 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यातील 22 हजार रुपयांचं कर्जही तिनं जमा केलं होतं. मात्र, मायक्रो फायनान्स कंपनीचे मॅनेजर निगम यादव हे थकीत रक्कम परत करण्यासाठी महिलेवर सतत दबाव टाकत होते. एकादिवशी कंपनीचे कर्मचारी महिलेच्या घरी गेले आणि तिच्या मुलाला त्यांनी उचलून नेलं. मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मुलाला जवळपास दोन आठवडे आपल्याजवळ ठेवलं. स्थानिकांनी आणि महिलेनं या संपूर्ण प्रकरणाची माहिती गढवा पोलिसांना दिली. त्यानंतर मुलाला वाचवण्यात आलं आणि आरोपीला अटक करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस सर्व मुद्यांचा तपास करत आहेत. तसंच या तपासासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची माहिती CWC ला देखील देण्यात आली असून CWC देखील संपूर्ण प्रकरणावर अधिक तपास करत आहे.- दीपक कुमार पांडे, एसपी, गढवा
हेही वाचा -