कोलकाता(पश्चिम बंगाल) BSF On High Alert Bangladesh Protest : पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारी विद्यार्थी संघटनांनी देशभरात आंदोलन केलं. सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे समर्थक आणि आंदोलकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर वकार-उझ-झमान यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सैन्यानं ढाका येथे 'अंतरिम सरकार' स्थापन करण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. बांगलादेशला लागून असलेल्या 4,096 किमी लांबीच्या सीमेवर भारतानं आपल्या सर्व फॉर्मेशन्समध्ये 'हाय अलर्ट' जारी केला आहे.
Air India tweets, " in view of the emerging situation in bangladesh, we have cancelled the scheduled operation of our flights to and from dhaka with immediate effect. we are continuously monitoring the situation and are extending support to our passengers with confirmed bookings… pic.twitter.com/WKGquoDmfH
— ANI (@ANI) August 5, 2024
घडामोडींवर बारकाईनं लक्ष : या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, "भारतीय गृह मंत्रालय बांगलादेशातील घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे." सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बीएसएफचे कार्यकारी महासंचालक दलजित सिंग चौधरी मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कोलकाता येथे पोहोचले. यादरम्यान दलजित सिंग चौधरी यांनी उत्तर 24 परगणा जिल्हा आणि पश्चिम बंगालच्या सुंदरबन भागाला भेट दिली. त्यांनी महत्त्वाच्या सीमावर्ती भागात बीएसएफच्या ऑपरेशनल सज्जतेचा आणि धोरणात्मक तैनातीचा आढावा घेतला.
सीमेवर सैनिक तैनात : 'बीएसएफ'च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, "बांगलादेशातील बदललेली परिस्थिती पाहता बीएसएफनं भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला. सीमेवर सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. सुरक्षा अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सर्व रडार सक्रिय असून हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे."
विमान उड्डाणं रद्द : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामुळं एअर इंडियानं बांगलादेशला जाणारी आणि तिथून येणारी उड्डाणं रद्द केली आहेत. या संदर्भात एअर इंडियानं 'एक्स'वर पोस्ट केलं आहे की, "बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेता आम्ही ढाका येथे जाणाऱया आणि तेथून निघणाऱ्या फ्लाइट्सचे नियोजित ऑपरेशन्स तत्काळ रद्द केले आहेत. आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करत आहोत."
दोन्ही देशांची सीमा : भारताची पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशशी 263 किमी, मेघालयमध्ये 443 किमी, त्रिपुरामध्ये 856 किमी आणि मिझोरममध्ये 1,096 किमी लांबीची सीमा आहे. या ठिकाणी 1 हजार 96 BSF चौक्या आहेत. बांगलादेशची सीमा ही डोंगर, नद्या आणि खोऱ्यांसारख्या कठीण भूभागानं वेढलेली आहे. सीमेवरील हालचाली आणि बांगलादेशातून भारतात होणाऱ्या अवैध स्थलांतरांवर कडक नजर ठेवण्याचं काम बीएसएफकडं सोपवण्यात आलं आहे.
हेही वाचा