गुवाहाटी (आसाम) Non Veg Food Ban 22 January : अयोध्या येथील राम मंदिरात सोमवारी, 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. आसामही याला अपवाद नाही. राज्यात सध्या रामाच्या नावाची धूम आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी देखील मीडियासमोर आपला उत्साह व्यक्त केलाय. त्यांनी आसाममधील सर्व लोकांना हा दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याचं आवाहन केलंय.
मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी : रविवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक मोठी घोषणा केली. त्यांनी लोकांना 22 जानेवारीला मांसाहार न करता उपवास करण्याचं आवाहन केलंय. 22 जानेवारी हा दिवस संपूर्ण राज्यात 'ड्राय डे' घोषित करण्यात आला असून, आसाममध्ये या दिवशी सर्व सरकारी कार्यालयं आणि शाळा दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहतील. रविवारी मुख्यमंत्री हिमंता यांनी घोषणा केली की, आसाममधील सर्व मांस आणि माशांची दुकानं सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहतील. 22 जानेवारीला दुपारी 4 वाजेपर्यंत रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी राहील. आसाम सरकारनं ही नोटीस जारी केली आहे.
दिवाळीप्रमाणे दिवे लावण्याचं आवाहन : राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीनं आसाममधील जनतेला संध्याकाळी दिवाळीप्रमाणे दिवे लावण्याचं आवाहन केलंय. याशिवाय आसाममधील अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याशिवाय, भाजपा कार्यकर्ते रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या थेट प्रक्षेपणासाठी अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था देखील करत आहेत.
महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी : अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा सोहळा सर्वांना पाहता यावा, यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय, या दिवशी केंद्र सरकारनं देखील कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
हे वाचलंत का :