नवी दिल्ली : Me Modi Ka Parivar : काही दिवसांतच लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वूमीवर सर्वत्र राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपाकडून "आम्हीच जिंकणार" या आत्मविश्वासात मोठी यंत्रणा कामाला लागल्याची स्थिती आहे. आता एक्स (ट्वीट) या समाज माध्यमावर "मी मोदी का परिवार" असं स्लोगन वापरून एकप्रकारचा लोकसभेचा प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, काल रविवार (दि. 3 मार्च) रोजी पाटणा येथे राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वात "जन विश्वास" सभा झाली. त्या सभेला संबोधित करताना राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार आमच्यावर परिवारवादाचा आरोप करतात. मात्र, त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं त्यावेळी त्यांनी मुंडन केलं नाही. त्यामुळे मोदी हे हिंदू सुद्धा नाहीत असा थेट घणाघात लालू यांनी यावेळी केला. त्यानंतर लगेच भाजपाकडून "मी मोदी का परिवार" ही मोहीम सुरू करण्यात आली.
बड्या नेत्यांनी नावापुढे लावलं "मोदी का परिवार" : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासारख्या बड्या नेत्यांपासून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्यासारख्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनीही आपल्या एक्स खात्यावर स्वत:च्या नावानंतर कंसात "मी मोदी का परिवार" असं लिहिलं आहे.
2019 ला "मैं भी चौकीदार" मोहीम : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी "चौकीदार ही चौर हैं" म्हणत नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजपाने "मैं भी चौकीदार" म्हणत काँग्रेसला उत्तर दिलं होतं. तेव्हा भाजपाच्या जवळपास सर्वच नेत्यांनी आपल्या समाजमाध्यमांच्या खात्यांवर आपल्या नावापुढे "मैं भी चौकीदार" असं लिहिलं होतं. त्याप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत "मी मोदी का परिवार" म्हणत भाजपाकडून विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं जातंय.
काय म्हणाले होते लालू : "पंतप्रधान नरेंद्र मोदी आजकाल घराणेशाहीवर फार बोलताना दिसतात. मात्र, मी तुम्हाला सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नाहीत. तसंच, त्यांच्याकडे कुटुंबही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईचं निधन झालं तेव्हा मुंडन केलं नाही. हिंदू धर्मात आईचं किंवा वडिलांचं निधन झाल्यावर मुंडण करतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यातलं काहीही केलं नाही. त्यामुळे ते हिंदू नाहीत" असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तसंच, राम रहिमच्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त तिरस्कार पसरवण्याचं काम करतात असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा :
1 मंत्री असो की सामान्य माणूस परिणाम माहित असणं आवश्यक- सर्वोच्च न्यायालयाचे उदयनिधी यांच्यावर ताशेरे
3 तरुणाकडून ॲसिड हल्ला! तीन तरुणी गंभीर जखमी; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर