बंगळुरू : Acid attack at Karnataka PU college : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात एका तरुणाने तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर ॲसिड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन तरुणी जखमी झाल्या असून, एका तरुणीची प्रकृती गंभीर आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. प्रेमास नकार दिला या भावनेतून या तरुणाने हा ॲसिड हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलींवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या तरुणाचं अबीन असं नाव आहे. तो 23 वर्षांचा आहे. तर, ज्या मुलीवर त्याने हल्ला केला ती मुलगी बारावीमध्ये शिकत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण : मुलगी परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली तेव्हा तिथे आधीच उपस्थित असलेल्या या तरुणाने तिच्यावर ॲसिड हल्ला केला. या घटनेत तिच्यासोबत असलेल्या दोन मुलीही गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तेथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी आरोपी अबीनला अटक केली आहे.
एमबीएचे शिक्षण घेतलेला तरुण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबीन हा केरळचा रहिवासी असून त्याने एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. तो पीडितेला ओळखतो. आरोपी आणि पीडित दोघंही केरळमधील एकाच ठिकाणचे रहिवासी आहेत. त्यांचं घरही शेजारीच आहे. त्याचं तिच्यावर प्रेम आहे. परंतु, तिच्याकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने तिच्यावर हा हल्ला केला अशी प्राथमिक माहिती आहे. सध्या या मुलींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याबाबत रुग्णालयाने सांगितल्यानुसार प्रकृती गंभीर असलेल्या मुलीची सुमारे 20 ते 25 टक्के दृष्टी गेली आहे.
हेही वाचा :
1 छत्तीसगड हादरलं! स्पॅनिश महिलेनंतर कलाकार महिलेवर सामूहिक बलात्कार
2 बांगलादेशच्या राजधानीत सात मजली इमारतीत अग्नितांडव; 44 जणांचा होरपळून मृत्यू