गडचिरोली : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आलंय. गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर एक पोलीस जवान जखमी झाल्याचीही माहिती समोर आली. भामरागडमधील कोपरीच्या जंगलात ही चकमक झाली. या घटनेला गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दुजोरा दिला.
जंगलात सर्च ऑपरेशन सुरू : गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपरी हा सीमावर्ती भागातील शेवटचा जंगल परिसर आहे. या भागात सध्या चकमक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कोपरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन राबवलं. यादरम्यान ही चकमक झाली.
कशी केली कारवाई? : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये विध्वंसक कारवाया करून घातपात घडवण्याच्या उद्देशानं मागील दोन दिवसापासून काही नक्षलवादी एकत्र येऊन कट रचनेच्या तयारीत होते. भामरागड तालुक्यातील जंगल परिसरात दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतिश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम .रमेश यांच्या नेतृत्वात सी 60 पथकाच्या 22 तुकड्या व सीआरपीएफ च्या QAT च्या 02 तुकड्या या जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवादविरोधी अभियान राबविण्याकरिता रवाना करण्यात आले होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
पाच नक्षलवाद्यांचा खात्मा : जंगल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस पथकाकडून नक्षलवाद्यांना शस्त्र खाली टाकून शरण येण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र, ते शरण न येता पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवला. सदर गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलीस पथकाकडून दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करावा लागला. या अभियानात पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झालं झालं. सदर जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम सोमवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. भामरागड येथे त्यांचा नियोजित दौरा होता. अशातच भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांसोबत चकमक घडल्यामुळं आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई : राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याचा प्लॅन नक्षलवाद्यांचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याआधीच गडचिरोली पोलिसांनी कारवाई करत पाच नक्षलवाद्यांना ठार केलं.
संयुक्त कारवाई : छत्तीसगडमधील नारायणपूरच्या सीमेला लागून असलेल्या भागात ही चकमक झाली, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं 'पीटीआय'ला सांगितलं. गडचिरोली पोलिसांच्या C60 कमांडो पथकानं आणि CRPF च्या पथकानं ही कारवाई केली, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. काही दिवसांपूर्वी नारायणपूरच्या भागात नक्षलविरोधी मोठी कारवाई सुरक्षा जवानांनी केली होती त्यावेळी देखील अनेक नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आलं होतं.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत 29 नक्षलवादी ठार - Naxalites Encounter in Chhattisgarh
- Naxals killed in Gadchiroli : पोलीस-नक्षलवाद्यांमधील चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हावी; माओवाद्यांची मागणी
- महाराष्ट्राच्या सीमेवर 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांमध्ये 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश - Naxal encounter in Abujhmad