VIDEO : जाणून घ्या पुण्याची ओळख असलेले पेशवेकालीन श्री मृत्युंजयेश्वर मंदिर - सरदार हरिपंत बल्लाळ फडके
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये पेशवेकालीन अतिशय सुंदर असे श्री मृत्युंजय ईश्वराचे मंदिर आहे. या मंदिराबाबतची विशेष माहिती पेशव्यांचे वंशज विनायक विश्वनाथ पेशवा यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली. उत्तर पेशवाईतील प्रख्यात सेनापती सरदार हरिपंत बल्लाळ फडके यांचे जेष्ठ चिरंजीव तथा दाजीबा फडके यांची कन्या सौ. राधाबाई यांचा विवाह १६/२/१७९७ रोजी रावबाजी उर्फ बाजीराव (द्वितीय) पेशवा यांच्याशी झाला. या विवाहाच्या वेळी फडके यांच्या मालकीचा कोथरूड येथील बगीचा आंदण म्हणून देण्यात आला. नुसता बगीचा देणे नको म्हणून बगीच्यामध्ये श्री मृत्युंजयेश्वर शिवमंदिर बांधण्यात आले. याच वेळी पौडफाटा येथील दशभुजा गणपति मंदिर, पुणे शहराबाहेरील मोती बाग सुध्दा आंदन म्हणून दिली. श्री रावबाजी यांनी मोती बागेत विश्रामबाग वाडा बांधला. पेशवाईच्या अखेरीस श्री रावबाजी यांनी पर्वती, सारसबाग, दशभुजा, मृत्युंजयेश्वर या 'खाजगीतील मंदिरांची व्यवस्था शहरातील पाच प्रतिष्ठीत व्यक्तींकडे सोपवली. १८४६ मध्ये ही सर्व मंदिरे मिळून श्री देवदेवेश्वर संस्थान स्थापन झाले. पूर्वीच्या काळ्या घडीव दगडाच्या मंदिरासमोर सभामंडप काढून नवीन प्रशस्त सभामंडप संस्थानाने बांधला. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री मृत्युंजयेश्वर श्री हनुमान,भवानी मातेची संगमरवरी मूर्ती असून उत्तरेकडील कोनात श्री विष्णू व डावीकडे श्री गजानन मूर्ती आहे.