पंढरपूर येथे श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न - विठ्ठल रुक्मिणी माता शाही विवाह
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर (सोलापूर) - वसंत पंचमी मुहूर्तावर आज पंढरपूर येथे श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी वाजंत्री पासून ते मंगल अक्षता पर्यंत सर्व विधिवत कार्यक्रम झाले. विठ्ठल - रुक्मिणी मातेला शाही पोशाख व अलंकाराने सजवण्यात आले होते. कोरोना नियमामुळे मोजक्याच वऱ्हाडी उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. वसंत पंचमी मुहूर्तावर श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार पार पडत असतो. या विवाह सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा मानली जाते. श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या शाही विवाह सोहळ्यासाठी मुदखेड मंदिर समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. श्री. विठ्ठल - रुक्मिणी मातेचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप व नामदेव पायरी रंगबिरंगी फुलांनी सजवण्यात आली होती. यामुळे मंदिर अधिकच खुलून दिसत होते. श्री. विठ्ठल-रुक्मिणी देवावर अक्षता टाकण्यात आल्या. देवाला मुंडावळ्या बांधण्यात आल्या तर, रखुमाईला विविध अलंकारांनी सजवण्यात आले होते. यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली. टाळमृदुंगाच्या गजरामध्ये विवाह सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्यही उपस्थित होते.