VIDEO : झाड कापायला विरोध केल्याने नागरिकाला पोलीस व्हॅनमध्ये कोंबले; पोलिसांनी व्यक्त केली दिलगिरी - मुंबई पर्यावरणवादी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईतील विलेपार्लेच्या रेल्वे परिसरामध्ये झाड कापण्याचा विरोध केल्यामुळे एका नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विलेपार्लेच्या रेल्वे परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेने एक झाड कापण्याची परवानगी दिली होती. मात्र, या झाड कापण्याला एका नागरिकाने विरोध केला. यावेळी विलेपार्ले पोलिसांनी या नागरिकाला जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील विलेपार्ले परिसरात विविध विकास कामांसाठी वृक्षतोड करण्यात येत आहे. अशातच विलेपार्ले पूर्व परिसरातील गावठाण भागातील रस्ता रुंदीकरणासाठी 100 वर्ष जुने वडाचे झाड महापालिकेच्यावतीने तोडण्यात येत होते. अशातच एक वृक्षतोड विरोधी कार्यकर्ता अभय आझाद यासंदर्भात जाब विचारण्यासाठी गेला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, नंतर पोलीस स्थानकात आणल्यानंतर मोठा विरोध झाल्याने त्याला सोडून देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी झालेल्या प्रकाराबद्दल ट्वीट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. हे झाड पालिकेच्या हद्दीत येत नसून गावठाण भाग जिल्हाधिकाऱ्यांच्या हद्दीत येत असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. दुसरीकडे, नाशिकमध्ये २०० वर्ष वडाचे झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून प्रयत्न होत असताना मुंबईतील मात्र झाडं वाचवण्यात येत नसल्यानं पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Last Updated : Jan 23, 2022, 4:24 PM IST