गिरीश महाजन यांचा दोरीवरच्या उड्या मारतानाचा व्हिडिओ व्हायरल - जळगाव लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे त्यांचा फिटनेस आणि बेधडक स्वभावासाठी चर्चेत असतात. ते कधी रस्त्यावरचा साप पकडतात, तर कधी ट्रॅक्टर, ट्रक अशी वाहने चालवतात. जंगलातील बिबट्याला शोधण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन फिरल्यानेही ते मध्यंतरी चर्चेत आले होते. आता गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते एका व्यायामशाळेत दोरीवरच्या उड्या मारताना दिसत आहेत. दोरीवरच्या उड्या मारत असतानाचे टायमिंग आणि लयबद्धता यामुळे त्यांच्या फिटनेसची चर्चा रंगली आहे. जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या एका समर्थकाची व्यायामशाळा आहे. या समर्थकाने त्यांना व्यायामशाळेला भेट देण्याचा आग्रह धरला होता. म्हणून महाजन व्यायामशाळेत गेले. त्याठिकाणी त्यांनी कसरतीच्या उपकरणांची माहिती घेतली. यावेळी महाजन यांनी दोरीवरच्या उड्या मारून दाखवत आपल्या फिटनेसचा परिचय दिला. आपण दररोज न चुकता व्यायाम करतो. दोरीवरच्या उड्या मारतो. त्यामुळे आपला फिटनेस चांगला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने व्यायाम करायला हवा, ती काळाची गरज आहे, असेही आवाहन गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले.