Tomato Price Hike : टोमॅटो खातोय 'भाव'; दराने शंभरी केली पार
🎬 Watch Now: Feature Video
नवी मुंबई : देशातील अनेक भागात टोमॅटोच्या दराने शंभरी ओलांडली आहे. नवी मुंबई वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपये दराने विकले जात आहेत. ही दर वाढ दिल्ली-एनसीआर बाजारासह उत्तर प्रदेश महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात जे टोमॅटो दर्जानुसार ३० ते ४० रुपयांनी बाजारात विकले जात होते, ते आता ७० ते ९० रुपये दराने विकले जात आहेत. तर काही ठिकाणी १०० रुपये किलोच्या आसपास दर पोहोचले आहेत. बिपरजॉय वादळामुळे झालेल्या पावसाचा राज्यातील टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे. बिपरजॉय वादळामचा फटका गुजरातमधील टोमॅटो पिकाला चांगलाच बसला आहे. तर तिकडे बिहार आणि पश्चिम बंगालमधील कडाक्याच्या उष्णतेमुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम झाल्याने आवक घटली आहे. देशातील अनेक राज्यांतील मंडईंमध्ये टोमॅटोची आवक घटली, त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे पावसाला सुरुवात झाल्याने टोमॅटो पिकावर परिणाम झाल्याचे समजते. दरम्यान, इतर शेतमालाला अधिक भाव मिळाल्याने, शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाकडे दुर्लक्ष केल्याचेही कारण पाहायला मिळते आहे. गेल्यावर्षी सोयाबिन पिकाला चांगला पाऊस मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबिनचे उत्पन्न अधिक घेतले. मात्र, मान्सूनला उशीर झाल्याने टोमॅटो, सोयाबीनच काय इतर पिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे इतर भाजीपालाही महागला आहे. केवळ टोमॅटोच नाही तर मंडईतील इतर हिरव्या भाज्यांच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. पुढील काही महिन्यांत टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या नवीन उत्पादनाची आवक वाढल्याने महागाईपासून दिलासा मिळणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.