Maratha Reservation Protest : सत्तेवर असताना मराठ्यांना शरद पवार का न्याय देऊ शकले नाहीत?
🎬 Watch Now: Feature Video
धुळे - Maratha Reservation Protest : राज्य आणि केंद्रात सत्तेवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाला का न्याय दिला नाही? असा प्रश्न खासदार सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांनी याचे उत्तर जनतेला द्यावे, असे आवाहनही त्यांनी केलं. (Subhash Bhamare On Sharad Pawar) धुळे शहरात भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीवर टीका - सुभाष भामरे यांनी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाच्या वेळेस घडलेली घटना (Jalna Maratha Protest) अतिशय दुर्दैवी असल्याचं सांगत याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली असल्याची माहिती दिली. हा प्रकार नेमका कशामुळे आणि कुणामुळे घडला, हे चौकशीत समोर येईलच. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी शांतता ठेवावी. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणून हा प्रश्न निकाली निघणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करणंदेखील आवश्यक आहे. अशा दुर्दैवी घटनेचं कुणीही राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) चालना मिळाली. ते आरक्षण देण्यात यशस्वी झाले. पुढे सुप्रीम कोर्टात अडचण निर्माण झाली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, असं सांगत त्यांनी फडणवीस यांची पाठराखण केली.
शरद पवारांनी उत्तर द्यावं - सुप्रीम कोर्टात आपण चांगल्या पद्धतीने बाजू का मांडू शकलो नाही, याचं उत्तर महाविकास आघाडीने जनतेला द्यावं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करणारे शरद पवार (Sharad Pawar) यांनी याचं उत्तर द्यावं. ते अनेक वेळा मुख्यमंत्री राहिले. तसंच केंद्रातही मोठे मंत्री होते. तरीदेखील आतापर्यंत ते मराठ्यांना न्याय का देऊ शकले नाहीत? असा प्रश्न सुभाष भामरे यांनी उपस्थित केला आहे.