Help For Irshalwadi Victims : इर्शाळवाडीच्या मदतीला पुण्यातील भोई प्रतिष्ठान, डॉक्टरांची टीम रवाना
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दरडग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानचे वैद्यकीय मदत पथक आज सकाळी शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ चौक येथून रवाना झाले आहे. वैद्यकीय मदतीसोबतच या बांधवांना भावनिक व मानसिक आधार देण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प येथून पुढे राबविण्यात येणार आहेत. या दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात येणार आहे. डॉ. मिलिंद भोई यांच्या नेतृत्वाखाली हे पथक रवाना झाले असून ज्यांना या बांधवांसाठी मदत करण्याची इच्छा आहे, त्यांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन डॉ. भोई यांनी केले आहे. याबाबत स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्यात आला असून, त्यांच्या समन्वयातून हे मदत कार्य होणार आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी आदिवासी पाड्यावर बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत मृतांची संख्या 26 वर पोहोचली. या गावात राहणाऱ्या 48 कुटुंबातील 228 नागरिकांपैकी 143 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. तर अद्यापही 87 जणांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आता येथील लोकांच्या मदतीला राज्यातील विविध संस्था, संघटना या पुढे येत असून मदतकार्य करत आहेत.