अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात 518 हेक्टरवरील पिकांना फटका, पंचनामे सुरु - जिल्हा कृषी अधीक्षक
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : जुलै महिन्यात 8 ते 28 तारखेपर्यंत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले जिल्ह्यातील 518 हेक्टरवरील ऊस, सोयाबीन, भुईमूग, नाचणी या पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू असून यानंतरच शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळेल अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय दिवेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात जून महिना संपला तरी पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलै महिन्यात 8 तारखेपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील धर्मक्षेत्रासह राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा, शाहुवाडी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, करवीर, शिरोळ या तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. मात्र 28 जुलैपासून पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली आहे.
परिणामी नदी काठावरील पिके पंधरा दिवस पाण्याखाली राहिल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि यामुळे 22 गावातील सुमारे दीडशे हेक्टर मधील उसाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे सध्या पंचनामे सुरू असून जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये ही पंचनामाचे काम सुरू असल्याचे दिवेकर यांनी सांगितले.
मुसळधार पावसाने उसासह भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी या खरीप पिकांचे ही नुकसान झाले आहे. शाहुवाडी तालुक्यातभाताचे अधिक उत्पन्न घेतले जाते मात्र अतिवृष्टीमुळे 31 गावातील 80 हेक्टर, भुदरगड तालुक्यातील 22 गावातील 50 हेक्टर, कागल तालुक्यातील 11 गावातील 44 हेक्टर मधील भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे, तर शिरोळ तालुक्यातील 5 हेक्टरवरील भुईमुगाचेही नुकसान झाल्याचा अहवाल कोल्हापूर कृषी विभागाने दिला आहे.