CM Shinde Visited Parner Taluka: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली पारनेर तालुक्यातील शेतातील पिकांची पाहणी - CM Shinde Visited Parner Taluka
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर: जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील गारपीट झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (मंगळवारी) आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रविवारी, ९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीट आणि ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी राज्यातील एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येतील. एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वितरित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी शेतकऱ्यांना दिले.
तातडीची मदत: भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या घराच्या उभारणीसाठी तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. ग्रामस्थांना तातडीच्या मदत स्वरुपात वनकुटे मधील पडझळ झालेल्या २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांसह इतर अधिकारी वर्गही उपस्थित होता.
घरांची पाहणी आणि विचारपूस: अवकाळी पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे. शेतातील कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके मातीमोल झाली आहेत. भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी करत त्यांची आस्थेने विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी यानंतर शेतकरी बबनराव रामभाऊ काळे, बबन मुसळे आणि बाबाजी मुसळे यांच्या शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळींब, संत्रा, आंबे, या फळपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच संबंधित शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती जाणून घेतली.