Machhindranath Samadhi Darshan : ७ लाख भाविकांनी घेतले मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन; मायंबा गडावर भक्तांची गर्दी - Machhindranath Sanjeevan Samadhi at Mayamba Fort
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर: जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सरहद्दीवर आणि बीड जिल्ह्यात असलेल्या श्री क्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथाच्या समाधी उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मंदिर व्यवस्थापनाकडून मच्छिंद्रनाथाची समाधी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी भाविकांसाठी खुली करण्यात येते. सूर्योदयाच्या पूर्वी पुन्हा समाधीचे कपाट बंद केले जातात.
ही आहे परंपरा: गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासून पहाटेपर्यंत पाच लाखहून अधिक भाविक दर्शनाला गर्दी करतात. विशेष म्हणजे, मच्छिंद्रनाथाच्या समाधीच्या दर्शनासाठी भाविकांना अंघोळ करून अर्धनग्न अवस्थेत जावे लागते. यासह नाथांच्या संजीवन समाधीवर सुगंधी उटण्याचा लेप लावण्यात येतो. हा सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातून भाविक श्री क्षेत्र मायंबा येथे हजेरी लावतात. यावेळी विद्युत रोषणाईने मच्छिंद्रनाथाचा मायंबा गड प्रकाशात न्हाऊन निघतो.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी: यंदाच्या उत्सवात मच्छिंद्रनाथ महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. तर श्री क्षेत्र मायंबा येथे नाथपंथाचे आद्य मत्सेद्रनाथ यांची संजीवन समाधी आहे. गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या प्रारंभी समाधीवर सुंगधी उटणे लावून नूतन वस्त्र अर्पण करून नाथांचे पूजन करत लाखो भाविकांनी नाथांचा आशिर्वाद घेतला. मायंबा येथे दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला समाधीला थेट स्पर्श करण्याची संधी मिळते. त्यामुळे यंदाच्या वर्षी ७ लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
समाधी पुन्हा वर्षभरासाठी बंद: मच्छिंद्रनाथ हे नवनाथांपैकी एक. मायांबा येथे त्यांची संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त गडावर दाखल होतात. वर्षांतून एकदाच ही समाधी उघडली जाते. जुना लेप काढला जातो नवीन लेप भक्तांच्या हाताने लावला जातो. पहाटे सूर्योदय होण्याच्या आधी समाधी पुन्हा वर्षभरासाठी बंद केली जाते. त्यामुळे आपलाही हात समाधीला लागावा, अशी मनोमन इच्छा प्रत्येक भाविकांची असते. त्यामुळे दिवसेंदिवस गडावर गर्दीही वाढत आहे.