Contract staff Agitation : विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन, दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा - आयुक्त डॉ. विपीन शर्मा
🎬 Watch Now: Feature Video

ठाणे - थकीत वेतन, बोनस व तीन वर्षांच्या वार्षिक रजेचे पैसे द्यावेत, अशा मागण्या करत आज लेबर युनियनच्या कामगारांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. त्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी गेले होते. मात्र, पालकमंत्री घरी नसल्याचे लक्षात येताच आंदोलक महापालिकेच्या दिशेने वळाले. दोन दिवसांत सर्व थकबाकी द्या, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही यावेळी कामगारांनी दिला.
ठाण्यातील दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे हस्तांतरण स्थानक ते प्रक्रिया प्रकल्पपर्यंत वाहतूक करण्याचे कंत्राट मेट्रो वेस्ट होल्डिंग या कंपनीला 2017 साली दहा वर्षांसाठी देण्यात आले होते. या कंपनीने ठाण्यातील सीपी तलाव येथील आपल्या कामासाठी वाहक, सहायक वाहक, हेल्पर या पदांसाठी एकूण 61 कंत्राटी कामगारांची नेमणूक केली होती. पण, मागील दोन ते तीन महिने या कामगारांना पगार मिळाला नसून त्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी जाहीर केलेल्या बोनसही देण्यात आलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी आज (दि. 23 मार्च) थेट पालिका मुख्यालयासमोर मोर्चा काढला. मागील तीन वर्षे या कामगारांना वार्षिक रजेचे पैसेही मिळाले नाहीत. त्यामुळे घर चालवणे कठीण झाले असल्याचे या कामगारांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी आज या कामगारांना गुढीपाडव्याच्या आधी सर्व रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यासाठी एक दीड कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आल्याची माहितीही भारतीय लेबर युनियनचे सरचिटणीस चेतन आंबेडकर यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत येत्या दोन दिवसात आम्हाला आमचा थकीत पगार व इतर पैसे मिळालेच पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी आज दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST