मुंबई : World Heart Day २०२३ : जगभरात होणाऱ्या मृत्यूंमध्ये सर्वात जास्त मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्यानं होतात. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळं दरवर्षी अंदाजे 17 दशलक्ष मृत्यू होतात. यापैकी बहुतेक मृत्यू हे कोरोनरी हृदयरोग किंवा स्ट्रोकमुळं होतात. आनुवंशिकता सतत बाहेर खाण्याच्या सवयी, बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान इत्यादी हृदयविकाराची मुख्य कारणं आहेत. जगभरात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर त्या रुग्णाला तातडीनं उपचार मिळणं आवश्यक असतं. यात पहिल्या एका तासात जर योग्य उपचार मिळाले तर मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे त्याला 'गोल्डन अवर' असं म्हटलं जातं. हा गोल्डन अवर म्हणजे नेमकं काय? याचा ईटीव्ही भारतनं घेतलेला हा आढावा.
हृदय निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक : हृदय निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा हृदय निरोगी असतं तेव्हा व्यक्तीला निरोगी वाटतं. त्याचवेळी, जेव्हा हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा एकंदर आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. अशा परिस्थितीत हृदयविकाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. याच जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधत आम्ही हृदयासंबंधीत आजारांचे विविध प्रश्न घेऊन देशातील नामवंत हृदयरोग तज्ञ डॉक्टर शरद रेड्डी यांच्याशी संवाद साधला.
सीपीआर हा महत्त्वाचा प्रथमोपचार : डॉक्टर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या हृदय रोगाचं प्रमाण तरुणांमध्ये देखील झपाट्यानं वाढत आहे. एखाद्या अभिनेत्याचा व्यायाम करताना मृत्यू झाल्याच्या बातम्या माध्यमांमधून आपल्यासमोर येत असतात. तर एखाद्या लहान मुलाचा देखील हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं आपण ऐकत असतो याला मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि अनुवंशिकता एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यास त्याला पहिल्या अर्ध्या तासात प्राथमिक उपचार मिळणं गरजेचं असतं ज्याला वैद्यकीय भाषेत आम्ही गोल्डन अवर असं म्हणतो. या प्रथम उपचारांमध्ये सीपीआर हा अतिशय महत्त्वाचा प्रथोपचार मानला जातो.
हार्ट सेव्हर्स मोहीम : डॉक्टर रेड्डी पुढे म्हणाले की, सडन कार्डियाक अरेस्ट पासून वाचणाऱ्यांचं प्रमाण हे 10% पेक्षा कमी आहे. त्यामुळे कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन म्हणजेच CPR आणि सार्वजनिक प्रवेश ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर AED चा वापर वाढवणं गरजेचं आहे. एका सर्वेनुसार रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तत्काळ सीपीआर दिल्यास रुग्ण जगण्याची शक्यता 10% ते 70% पर्यंत वाढते. ही आपत्कालीन गरज असून, यासाठी आम्ही सक्रियपणे एक देशव्यापी सीपीआर प्रशिक्षण मोहीम राबविणं आवश्यक आहे. या आरोग्य साक्षरेतेसाठी आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही एक मोहीम देखील राबवत असून, हार्ट सेव्हर्स असं या मोहिमेचं नाव आहे. CPR सारख्या तंत्राचं सामान्य लोकांना प्रशिक्षण देवून जनजागृती करणं हा या मागचा उद्देश आहे.
प्रत्येकानं सीपीआर शिकला पाहिजे : डॉक्टर रेड्डी यांनी सांगितलं की, हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे. CPR जीव वाचवण्यास मदत करू शकते. 2016 मध्ये जगभरात हॉस्पिटलबाहेर 350,000 हून अधिक हृदयविकाराच्या घटना घडल्या. दुर्दैवानं हृदयविकाराच्या झटक्यानं 88 टक्के लोक हॉस्पिटलबाहेर मरण पावतात. कोणीही सीपीआर शिकू शकतो आणि प्रत्येकानं शिकला पाहिजे. अमेरिकन हार्ट असोसिएशननं दिलेल्या अहवालानुसार, 70 टक्के लोकांना हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत असहाय वाटतं कारण त्यांना CPR प्रभावीपणे कसा द्यावा हे माहीत नसतं. हृदयानं काम बंद केल्यानंतर चार ते सहा मिनिटांत मेंदूचा मृत्यू होतो. सीपीआर प्रभावीपणे रक्त प्रवाह राखतं आणि मेंदू आणि इतर महत्वाच्या अवयवांना ऑक्सिजन प्रदान करतं. ज्यामुळं पीडित व्यक्तीला पूर्ण बरे होण्याची संधी मिळते. हृदयविकाराच्या पहिल्या दोन मिनिटांत सीपीआर दिल्यास जगण्याची शक्यता वाढते, असं देखील डॉक्टर रेड्डी यांनी म्हटलं आहे. सीपीआर म्हणजेच एका अर्थानं कृत्रिम श्वसन क्रिया. आणीबाणीच्या परिस्थितीत छातीवर विशिष्ठ प्रकारे दाब देऊन किंवा तोंडाने रुग्णाला श्वासोच्छ्वास करावा लागतो. डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याच्या मधल्या वेळेत योग्य प्रशिक्षण घेतलेला कुणीही ही प्रक्रिया करु शकतो. त्यामुळे जीव वाचू शकतो.
हेही वाचा :