'व्हॅलेंटाईन डे' प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो, हा एकप्रकारे प्रेमीयुगुलांसाठी प्रेमाचा अनोखा उत्सवच आहे. या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर-प्रेयसी किंवा जोडीदाराला सुंदर भेटवस्तू आणि संदेश पाठवतात. पण हा दिवस का साजरा केला जातो आणि त्यामागची स्टोरी काय आहे हा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत...
मागील अनेक वर्षांपासून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया आणि संपर्क करण्याच्या माध्यमांमध्ये वाढ झाल्याने या दिवसाच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. त्यामुळे जगभरात हा दिवस साजरा करणाऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. परंतु, भारतात 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यावरून काही वर्गांतून विरोध केला जातो. पण या सगळ्यांना फाटा देत प्रेमीयुगुल, प्रेम व्यक्त करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती यादिवशी फूल, चॉकलेट आणि गिफ्ट्स देऊन आपले प्रेम व्यक्त करत असतात.
व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो
रोममध्ये तीसऱ्या शतकातील क्लॉडियस या क्रूर राजाने प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांवर अनेक बंधनं लादली, त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. क्लॉडियस राजाचं असं मत होतं की, अविवाहित पुरूष हे विवाहित पुरूषांच्या तुलनेत अधिक चांगले होऊ शकतात. त्यामुळे त्याने सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न न करण्याचा आदेश दिला होता. संत व्हॅलेंटाइन यांनी राजाच्या या आदेशाला कडाडून विरोध केला होता. त्यांनी अनेक सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची लग्न लावून दिली होती.
संत व्हॅलेंटाइन हे धर्मगुरू होते. त्यांनी प्रेमाचा प्रसार आणि प्रचार केला. पण राजाच्या आदेशाला धुडकावल्यामुळे राजाने त्यांना १४ फेब्रुवारीच्याच दिवशी फाशीची शिक्षा दिली. तेव्हापासून आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीला व्हॅलेंटाइन म्हणण्यास सुरूवात झाली. संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या या संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात कशी झाली -
'व्हॅलेंटाईन डे' या दिवसाची सुरूवात एका रोमन उत्सवापासून झाली. रोममध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत ‘Lupercalia’ नावाचा उत्सव साजरा केला जायचा. या उत्सवात मुले बॉक्समधून मुलींच्या नावे काढत असत. उत्सवादरम्यान ही जोडपी प्रेयसी-प्रियकर बनून फिरत असत आणि कधीकधी ते लग्नबंधनात देखील बांधली जात. नंतर तेथील चर्च ख्रिश्चन उत्सव म्हणून आणि संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यास सुरूवात केली. यानंतर लोक आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी संत व्हॅलेंटाईन नावाचा वापर करू लागले.
व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करतात
हा दिवस कार्ड, मिठाई, गुलाब, रोमँटिक डेट, मित्रांसमवेत वेळ घालवून साजरा करू शकतो. तसेच आपण रोमँटिक डिनर किंवा लंचसाठी बाहेर जाऊ शकता किंवा कोणत्याही रोमँटिक ठिकाणी वेळ घालवू शकतात. या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना आवडत्या भेटवस्तू किंवा एखादा गोड पदार्थ देऊन नात्यातील स्नेह वाढवू शकता. या दिवशी एखाद्यावरील प्रेम व्यक्त करू शकता.
व्हॅलेंटाईन डे कोणासोबत साजरा केला जातो
व्हॅलेंटाईन डे मुलगा किंवा मुलगी कोणा एकासाठी नसून हा दिवस दोघांसाठी असतो. हा दिवस दोघेही साजरा करू शकतात. हा आनंदाचा किंवा प्रेमाचा उत्सव केवळ जोडप्यांसाठीच नव्हे तर मनातील प्रेमासाठी साजरा केला जातो आणि आपल्या मनातील ते प्रेम कोणासाठीही असू शकते. त्यामुळे हा दिवस तुम्ही आई-बाबा, भाऊ-बहिण, मित्रमैत्रीण कोणासाठीही साजरा करू शकता.
गिफ्ट देण्यासाठी या पर्यायांचा करा विचार -
'व्हॅलेंटाईन डे' सगळे कपल्स अगदी उत्साहात साजरा करतात. पार्टनरचा बर्थडे सोडून तुम्ही इतरवेळी गिफ्ट देत नसाल तर तुमच्यासाठी ही संधी आहे. व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट देऊन पार्टनरला खूश करू शकता. तुम्हाला जास्त खर्च करायचा नसेल तर दैनंदिन वापरातील वस्तुसुद्धा तुम्ही पार्टनरला गिफ्टमध्ये देऊ शकतात. पार्टनरला पिलो दिलात तर तुमची एक चांगली आठवण राहील. मुलांना गिफ्ट देत असताना तुम्ही रोज लागणारे पाकीट, बेल्ट, परफ्यूम, टी शर्ट, घड्याळ देऊ शकता. तसेच तुमच्या पार्टनरच्या आवडत्या रंगाचे आणि पॅटर्नच्या वस्तु तुम्ही देऊ शकता.
तुम्हाला जर मुलीला गिफ्ट द्यायचे असेल तर टेडी बिअरसुद्धा देऊ शकता.तसेच चॉकलेट्स, लाल रंगाचा रोमॅंटिक ड्रेस, मेकअप कीट अथवा वॅनिटी केस, हार्ट शेपमधील दागिने, हॅंडलूम साडी, हेअर स्ट्रेटनर अथवा कर्लर, स्टायलिश डिझायनर हॅंडबॅग, घड्याळ, होममेड साबण या पर्यायांचा गिफ्ट देण्यासाठी तुम्ही विचार करू शकता.