हैदराबाद - पोषक आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी सरत्या वर्षात महत्त्वाच्या ठरल्या. कोविड-१९ च्या प्रतिबंधांमुळे लोकांना स्वत:साठी बराच वेळ मिळाला. त्यातल्या बऱ्याच जणांनी त्यांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती याकडे विशेष लक्ष पुरवले. काहींनी नेहमीच्या रुटिनमध्ये व्यायामाची भर घातली. काहींनी आरोग्याकडे लक्ष दिले आणि पोषक आहार सुरू केला. आरोग्याची विशेष काळजी घेताना काही जणांनी केटो डाएट, पॅलेओ डाएट, लष्करी डाएट इत्यादी सुरू केले. ज्यांना असे काही डाएट्स सुरू करता आले नाहीत, त्यांनी जंक फूडच्या जागी पोषक आहार घेणे सुरू केले. २०२० मधल्या सर्वोत्तम डाएट आणि पोषक अन्नपदार्थांकडे एक नजर टाकू या –
डाएट्स -
सध्याच्या परिस्थितीत अगदी योग्य शरीरयष्टी ठेवण्यासाठी पुढील प्रकारचे डाएट हे ट्रेंड बनले. यातल्या काही डाएट्समध्ये पोषक अन्न द्रव्याशी तडजोडही करावी लागली. या वर्षातले लोकप्रिय डाएट्स पाहा –
केटो डाएट -
केटो डाएट हे सेलिब्रिटींची पहिली पसंती असते. पण जास्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असलेल्या या आहारामुळे वजन झटपट कमी होते, म्हणून सर्वसामान्यांमध्येही हे डाएट लोकप्रिय होते. या डाएटमध्ये धान्य, साखर, ब्रेड, अल्कोहोल, दुधाचे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ पूर्णपणे टाळले जातात. या वर्षी हे डाएट मुख्य बातमीत राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे एका प्रादेशिक अभिनेत्रीचा मृत्यू. केटो डाएट या मृत्यूला कारणीभूत असल्याची चर्चा होती. केटो डाएटचा शरीरावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल बरेच प्रश्न उपस्थित झाले होते आणि हे डाएट डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. या डाएटचे काही दुष्परिणामही आहेत. जसे की दीर्घकाळापर्यंत पोटाची समस्या, शरीरात पेटके येणे, मळमळणे, हृदयाची धडधड, आळशीपणा आणि सुस्तपणा या समस्या उद्भवतात.
इंटरमिटन फास्टिंग ( अधूनमधून उपवास ) -
या प्रकारचे डाएट अनेक पद्धतीने करता येते. सर्वसाधारण दोन प्रकार आहेत ते असे, पहिला प्रकार म्हणजे सकाळी व्यक्ती हलका आहार घेते, खूप कमी आहार दुपारी घेते आणि रात्री अजिबातच जेवत नाही. दुसरा प्रकार, व्यक्ती आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घन आहार अजिबात घेत नाही. या डाएटमुळे वजन कमी होते, डीटॉक्सिफाई होते, स्मरणशक्ती वाढते आणि माणसाला दीर्घायुष्य मिळते. म्हणून लॉकडाउनमध्ये अनेकांनी हे डाएट निवडले. पण हेही लक्षात घ्यायला हवे की गरज नसताना बराच काळ केलेल्या उपवासामुळे मूत्रपिंड आणि स्वादुपिंडाच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो. शरीराला आवश्यक असलेली चरबीही कमी होते आणि त्याचा परिणाम मुख्यत्वे त्वचा आणि मेंदूवर होतो.
लष्करी डाएट
कमी कॅलरीज असलेले हे डाएट या वर्षी लोकप्रिय झाले होते. कारण हे आठवड्यातून ३ दिवस केले जाते आणि नेहमीचा आहार उरलेले ४ दिवस घेता येतो. पहिल्या ३ दिवसात व्यक्तीला ११०० – १२०० कॅलरीजपेक्षा कमी कॅलरीजचे सेवन करावे लागते. आणि पुढच्या ४ दिवसांत १८०० कॅलरीजचे सेवन करावे लागते. हा आहार तीन दिवसात सुमारे २ किलो वजन कमी करण्यास मदत करतो.
सर्टफूड डाएट
कोविड १९ चा साथीचा रोग पाहता हे डाएट सर्व डाएट्समध्ये सर्वोत्तम आहे. यात अँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. या डाएटमुळे शरीरातली चरबी कमी होते. त्यामुळे वजन कमी होते. या आहारात ग्रीन टी, हळद, सफरचंद, ओवा, लिंबूवर्गीय फळे, ब्लूबेरी, सोया, डार्क चॉकलेट, केळी आणि ऑलिव्ह ऑईल यांचा समावेश असतो. या डाएटमुळे शरीरातील सिर्ट्युइन प्रथिनांचे कार्य वाढवण्यात मदत होते. सिर्ट्युइन प्रथिने आपल्या शरीरातल्या पचनसंस्थेला कमकुवत करणाऱ्या पेशींपासून रक्षण करते. तसेच जळजळ, त्वचेवर सुरकुत्या पडणे यापासून संरक्षण करते.
इतर काही डाएटमध्ये पालिओ डाएट, अटकिन्स डाएट आणि डॅश डाएट यांचा समावेश होता. अनेक जण वजन कमी करण्यासाठी हे डाएट करतात.
पोषण -
कोविड १९ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला करतो. म्हणूनच यावर्षी प्रत्येकानेच आपण काय खातो आणि काय पितो याची काळजी घेतली. जास्त करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नपदार्थ आहारात समाविष्ट केले. डॉक्टरांनी देखील व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि इतर मल्टीव्हिटॅमिन पूरक कोर्सची शिफारस केली. वजन कमी करण्याबरोबरच स्वत: ला निरोगी ठेवणे हेच ध्येय होते. २०२०मध्ये लोकांना आलेल्या समस्या आणि त्यावरचे अन्नपदार्थ पुढीलप्रमाणे –
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
या वर्षी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे एकदम प्रकाशझोतात होते. त्यामुळे जास्त व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ लोकांनी आहारात समाविष्ट केले. लोकांनी लिंबू, संत्री, आवळा, किवी, डाळिंब, सफरचंद यासारखे व्हिटॅमिन सी भरपूर असलेल्या पदार्थांचे सेवन केले. तुळस, लसूण, फ्लेक्स बिया, बेरी, बीन्स इत्यादी अँटिऑक्सिडेटिव्ह पदार्थही खाल्ले गेले. लोकांनी आपल्या रोजच्या जेवणात व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि झिंक यांचा समावेश केला.
निद्रानाशावर अन्नपदार्थ
लाॅकडाउनमुळे घरात बंदिस्त राहावे लागले आणि त्यात भविष्याबद्दलची अनिश्चिंती यामुळे अनेक जणांना तणाव, औदासिन्य आणि अस्वस्थता याचा सामना करावा लागला. यामुळे अनेकांच्या अनेक रात्री झोपेविना गेल्या. अशा वेळी गरम दूध, शेंगदाणे, कॅमोमाइल चहा, किवी, चरबीयुक्त मासे इत्यादी पदार्थ उपयोगी पडले.
मूड चांगला करण्यासाठी
आपण जे काही खातो त्याचा परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावर होत नाही, तर मानसिक आरोग्यावरही याचा मोठा परिणाम होत असतो. आपल्याला हे चांगलेच ठाऊक आहे की, या वर्षी मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये तणाव, औदासिन्य आणि अस्वस्थता सर्वात अधिक होते. यावर २०२०मध्ये अंडी, डार्क चॉकलेट, दही, ग्रीन टी, शेंगदाणे, कॉफी, केशर, बीन्स आणि मसूर या पदार्थांनी मूड चांगला करायला मदत केली.
उत्साह वाढवण्यासाठी
दिवसभर घरी बसून राहिल्याने लोकांना आळशी बनवले आणि त्यांचे बरेच दिवस असेच काहीही न करता गेले. त्यामुळे अनुत्साह वाढत होता. पण केळी, सफरचंद, कॉफी, स्ट्रॉबेरी, डार्क चॉकलेट, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या या पदार्थांनी उत्साह वाढवायला मदतच केली.
असे म्हणतात आपण जे खातो, तसे असतो. आपल्या आहारावरूनच आपले आपले आरोग्य ठरते. चांगला आणि आरोग्यपूर्ण आहाराने तुमचा मूड चांगला होतो. उलट आरोग्याला अयोग्य आहार केला तर मनस्थिती बिघडते. त्यामुळे तुम्ही आळशी होता आणि वजन वाढते. म्हणूनच, प्रोबायोटिक, कॉम्प्लेक्स कार्बोडायड्रेड्स, ओमेगा – ३, चरबीयुक्त अॅसिड, अँटिऑक्सिडेंट्स, फोलेट, व्हिटॅमिन ए, सी आणि डी, प्रथिने, झिंक, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वांचा आहार निरोगी हीच जीवनाची गुरुकिल्ली आहे.