अनेकवेळा लोक खूप पैसे लावून जागेनुसार मोठी किंवा छोटी बाग सजवतात. मात्र, बहुतांश लोक लावलेल्या झाडांच्या काळजीशी संबंधित मूलभूत गोष्टींची माहिती घेत नाहीत जसे, झाडांची काळजी कशी घ्यावी, त्याला किती पाणी टाकावे किंवा त्याला किती सूर्यप्रकाश आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर, तर झाडांना आजार झाल्यास लोकांना त्याचे कारण किंवा त्याची लक्षणे देखील समजून येत नाही.
या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत सुखीभव'ला झाडांची काळजी कशी करावी आणि त्यांच्यात होणाऱ्या विविध समस्यांची लक्षणे याबाबत इंदौर येथील मा दुर्गा नर्सरीचे संचालक बाबू बिपिन कुमार यांनी माहिती दिली. बिपिन कुमार सांगतात की, विविध मोसमात इंडोर आणि आऊटडोर दोन्ही प्रकारच्या बागेची देखभाल वेगवेगळ्या प्रकारे करणे गरजेचे आहे. जसे पावसाळ्यात काही झाडांना कमी पाण्याची गरज असते, उन्हाळ्यात अधिक पाणी आणि हिवाळ्यात उन्हाची गरज अधिक असते. या व्यतिरिक्त झाडात टाकण्यात येणाऱ्या खताचे प्रमाण आणि त्याचे प्रकार देखील झाडाच्या आवश्यक्तेनुसार असायला हवे. जर असे केले नाही तर, झाडे आजारी होऊन मरू शकतात.
झाडाला काय समस्या आहे, हे कसे ओळखाल?
बिपिन कुमार सांगतात की, झाडांची अवस्था पाहून त्यांच्या समस्येबाबत माहिती मिळू शकते जसे, झाडाला पाणी अधिक टाकण्यात येत असल्यास मातीत नेहमी अधिक ओलावा दिसून येईल. झाडाच्या पाणांचे रंग बदलेल आणि झाड कोमेजलेले दिसेल. या अवस्थेत बहुतेक पाणे पिवळ्या रंगाची दिसून येतात. अनेकदा झाडे, फांद्या आणि देठांवर बुरशी देखील दिसून येते. तेच जर झाडाला पाणी कमी टाकण्यात आले असेल तर, कुंडीतील मातीला भेगा पडतात. या व्यतिरिक्त झाडाच्या फांद्या, देठ आणि पाणे तपकिरी दिसू लागतात. इतकेच नव्हे तर, पाणे सुकून गळू लागतात.
प्रत्येक झाडासाठी सूर्यप्रकाशाची गरजही वेगळी असते. काही झाडांना खूप अधिक सूर्यप्रकाश पाहिजे असतो जसे, फळे आणि फूल असलेली झाडे (गुलाब, गुड़हल (Hibiscus), डहेलिया, झेंडू) किंवा बोन्साय. तसेच, काही झाडांना थोडाच सूर्यप्रकाश आवश्यक आहे जसे, ड्रिसकेना, कलाथिया, लॅव्हेंडर, पार्लर पाम, बांबू, स्नेक प्लांट आणि फिलोडेंड्रोन इत्यादी.
जर कमी सूर्यप्रकाशाची गरज असलेल्या झाडांना अधिक सूर्यप्रकाशात ठेवले तर, केवळ त्यांच्या पाणांचाच रंग बदलत नाही तर, ते वाळून मरू लागतात. तेच अधिक सूर्यप्रकाशाची गरज असलेल्या झाडांना जर सूर्यप्रकाश मिळाला नाही किंवा कमी मिळाला तर, त्यांच्यावर फळे किंवा फुले लागत नाही.
काय आहे उपाय?
झाडांना विकत घेण्याअगोदर त्यांच्या पाण्यासंबंधी गरजांबाबत पूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि झाडांना ठेवणे किंवा ठेवण्याच्या जागेची निवड त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या गरजेनुसारच असायला हवी.
बिपिन कुमार सांगतात की, खत देखील झाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. काही विशिष्ट झाडांना वेगवेगळ्या प्रकारचे खत टाकले पाहिजे, हे बहुतांश लोकांना माहिती नसते. खत अनेक प्रकारचे असते जसे, शेनाचे खत किंवा जैविक खत, कंपोस्ट खत, हिरवे खत आणि रासायनिक खत. झाडांमध्ये त्यांच्या गरजेनुसार त्याचे वापर केले जाते. जर झाडाला त्याच्या प्रकृतीनुसार योग्य खत मिळाले तर, ते खूप अधिक काळापर्यंत जगतात. तेच योग्य खत त्यांच्यात किडे लागण्याच्या समस्येलाही बऱ्याच प्रमाणात कमी करू शकते.
कीड लागणे देखील झाडाच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांमधून एक असते. जर एखाद्या झाडामध्ये कीड लागली तर, त्याच्या पाणांमध्ये किडे दिसून पडतील किंवा झाडात छिंद्र दिसतील. या शिवाय पाणांवर पांढऱ्या रंगाचे डाग किंवा पट्टे दिसू लागतील. अशात एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन झाडावर आवश्यक प्रमाणात कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक असते.
बिपिन कुमार सांगतात की, ज्या लोकांना झाडे लावण्याची इच्छा आहे, त्यांना त्या विषयी माहिती असणे देखील गरजेचे आहे. तेव्हाच ते आपल्या झाडांची योग्य काळजी घेऊ शकतील आणि त्यांची बाग देखील निरोगी, सुंदर आणि हिरवीगार राहील.
हेही वाचा - मीठ खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? पुरावे सांगतात..