हैदराबाद - मकरसंक्रांत हा प्रसिद्ध भारतीय सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात हा खिचडी उत्सव, गुजरात आणि राजस्थानमध्ये पतंगोत्सव, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात संक्रांती, तामिळनाडूमध्ये पोंगल, आसाममध्ये भोगली बिहू आणि पंजाबमध्ये लोहरी म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक भारतीय सणांमध्ये देवाला ठराविक गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. सणाला तो पदार्थ खाल्लाही जातो. ती वेळ आणि तो ऋतू पाहून हे पदार्थ तयार केले जातात. अगदी तसेच मकरसंक्रांतीच्या सणालाही ‘लाडू’, ‘गजक’ आणि ‘चिक्की’ अशा तीळ आणि गुळाचा वापर करून तयार केलेल्या मिठाई बनवण्याची परंपरा आहे. म्हणूनच या हंगामात तीळ आणि गूळ खूप लोकप्रिय आहेत. आपण त्यांचे काही फायदे पाहूया.
तिळामधील पौष्टिक घटक
तिळात प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, तांबे, लोह, मॅग्नेशियम इत्यादींसारखे पुष्कळ पोषक घटक असतात. त्यात आढळणारी पोषक तत्त्वे शरीराला अनेक प्रकारे उपयोगी आहेत. जसे की तांबे सांधेदुखीवर उपाय ठरते आणि मॅग्नेशियम रक्तप्रवाह चांगला ठेवते, रक्तातली साखरेची पातळी आणि श्वसन व्यवस्थेचे आरोग्य योग्य प्रकारे राखते. यातले कॅल्शियम मायग्रेन बरे होण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच मासिक पाळी सुरू होण्याआधीचा त्रास, ऑस्टिओपोरोसिस आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग यावर तीळ प्रभावी ठरतात.
गुळामधील पौष्टिक घटक
गुळामध्ये आरोग्यासाठी बरेच लाभदायी घटक आहेत आणि हिवाळ्यात गुळाला सुपरफूड मानले जाते. कारण त्यापासून शरीराला नैसर्गिक उष्णता मिळते. यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलिक अॅसिड आणि लोह यासारखे पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
तीळगूळ खाल्ल्याचे फायदे
आपण सगळेच मकरसंक्रातीला तीळगूळ आवडीने खातो. पण तीळगूळ बनवण्यामागचे शास्त्रीय कारण ठाऊक आहे का ? तज्ज्ञ सांगतात, मकरसंक्रांतीला तीळगूळ खाण्यामागचे कारण म्हणजे, या दिवसात अनेक ठिकाणी थंडी प्रचंड असते. या काळात आपल्या शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते. तीळ आणि गुळात उष्ण घटक आहेत. तिळात भरपूर तेल असते. त्यातले तिलिन अँटिऑक्सिडंट्स आणि गूळ एकत्र केल्याने तयार झालेला पदार्थ शरीराला नैसर्गिक उष्णता देतो. म्हणूनच मकरसंक्रांतीला तीळगूळ बनवले जातात आणि खाल्ले जातात.
तीळगूळ आणि गजकचे फायदे
- तीळ आणि गुळाचे लाडू आणि इतर गोड पदार्थ फुफ्फुसासाठी उत्तम आहेत. तिळामुळे फुफ्फुसातले विषारी पदार्थ निघून जातात.
- यात कॅल्शियम मुबलक असते. ते हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
- तीळगूळ हे पचनसंस्थेसाठी उपयोगी आहेत. यामुळे फक्त अॅसिडिटीपासून आराम मिळत नाही, तर बद्धकोष्ठताही बरी होते. तिळामुळे भूक वाढते.
- तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू आणि गजक तुमच्या शरीराला उर्जा देतात. शरीरात रक्तप्रवाह चांगला होतो. तसेच तीळ आणि गुळाने त्वचा आणि केस चमकदार बनतात.
म्हणूनच तीळ आणि गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यांचे आपापले असे उपयोग आहेतच. शिवाय एकत्र करूनही तितकेच चांगले फायदे आहेत. फक्त शारीरिक नाही, तर मानसिक आरोग्यही तीळगुळाने चांगले राहते. यामुळे तणाव आणि औदासिन्य निघून जाते. तीळगूळ शरीराला उर्जा देतात आणि अशक्तपणा दूर करतात.