हैदराबाद - २०२१–२२चा अर्थसंकल्प भारतातील आरोग्य क्षेत्रासाठी एक आशीर्वाद ठरला आहे. आपल्या देशात आरोग्य सेवेच्या अधिक चांगल्यासाठी आणि नवजात बालके, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत सर्वांना या आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी केल्या आहेत. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताद्वारे निर्मित न्यूमोकोकल लसीबद्दल नमूद केले आहे. ही लस सध्या ५ राज्यांमध्ये उपलब्ध आहे. २०१७ पासून जागतिक लसीकरण कार्यक्रमात न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस (पीसीव्ही) सुरू करण्यात आली होती. ही लस आता उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यात उपलब्ध आहे. पण आता ही देशभरातील सर्व शहरांमध्ये उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. कारण ही लस स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि न्यूमोकोकस बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजारापासून महत्त्वाचे संरक्षण देते. आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे ५०,००० मुले न्यूमोकोकस बॅक्टेरियामुळे मरतात.
काय आहे ही लस ?
हैदराबादच्या रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे एमडी एमआरसीपीसी (यूके), कन्सल्टंट नवजात बालक तज्ज्ञ डॉ. विजयनंद जमालपुरी सांगतात की, न्यूमोकोकस बॅक्टेरियामुळे न्यूमोनिया होतो. म्हणूनच ही लस खूप प्रभावी आणि ती घेतलीच पाहिजे अशी आहे. भारत सरकारतर्फे पुरवल्या जाणार्या इतर काही लसींपेक्षा ही थोडीशी खर्चिक असल्याने सध्या ती विनामूल्य नाही. यामुळेच बरीच मुले, विशेषत: ग्रामीण किंवा दुर्गम भागात जन्मलेली मुले यापासून वंचित आहेत. ही लस बाळाला ६ आठवडे, १४ आठवडे आणि ९ महिन्यांत दिली जाते. डॉ. विजयनंद म्हणतात की, बुस्टर डोस देखील कधीही १२ ते १५ महिन्यांच्या दरम्यान दिला जातो. ते असेही सांगतात की ५० वर्षानंतर आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांनीही ही लस घ्यावी.
न्यूमोकोकस बॅक्टेरिया
शरीरातल्या अनेक अवयवांवर घाला घालण्याचा क्षमता न्यूमोकोकस बॅक्टेरियामध्ये असते. यामुळे मॅनिनजायटीस, रक्तात होणारा संसर्ग, सायनुसायटीस, कानात होणारा संसर्ग हे आजार होऊ शकतात. या आजारांकडे दुर्लक्ष केले तर मुलाचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच या बॅक्टेरियापासून संरक्षण मिळण्यासाठी मुलांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. हा आजार दोन भागात विभागता येईल. आक्रमक आणि आक्रमक नसणारा
आक्रमक
या प्रकारात रक्तात झालेल्या संसर्गामुळे आजार होतात. यामध्ये संसर्ग शरीरातल्या आतल्या महत्त्वाच्या अवयवांवर होते. हा गंभीर आजार आहे आणि याकडे दुर्लक्ष केले तर प्राणघातक ठरू शकते. आक्रमक न्यूमोकोकल आजारांमध्ये अनेक प्रकारचे आजार येतात. त्यात मुख्यत्वे करून मेंदू, हाडे आणि रक्तात संसर्ग होतो. जसे की सांधे संसर्ग म्हणजे सेप्टिक आर्थरायटिस, मेंदूचा दाह अर्थात मेंदुज्वर, ऑस्टियोमायलाईटिस म्हणजेच हाडे, बॅक्टेरिमिया आणि सेप्टीसीमियाचा संसर्ग.
आक्रमक नसलेले
जरी ते आक्रमक न्यूमोकोकल रोगापेक्षा कमी गंभीर मानले गेले असले तरी या अवस्थेमुळे शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम होऊ शकतो. आक्रमक नसलेल्या न्यूमोकोकल रोगात ब्रॉन्कायटीस म्हणजेच फुफ्फुसांचा आणि लघू श्वासनलिकेचा संसर्ग, कानाचा संसर्ग किंवा आणि सायनुसायटिस किंवा सायनसचा संसर्ग होतो.
म्हणूनच या वर्षाच्या अर्थसंकल्पात या लसीचा उल्लेख केल्यामुळे, लस अधिक लक्ष वेधून घेत आहे. आणि आता अशी अपेक्षा आहे की येत्या काही वर्षांत जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही लस पोचू शकेल. या न्यूमोकोकल रोगांमुळे होणाऱ्या मुलांमधील मृत्यूचे प्रमाण लक्षणीय घटेल. आपण कोणत्याही बालरोग तज्ज्ञास या लसीबद्दल विचारू शकता आणि आपल्या मुलास लस देऊ शकता.