हैदराबाद - सध्या आरोग्याबद्दल बोलताना जास्त बोलले जाते ते लठ्ठपणा किंवा अति वजन या बद्दल. लठ्ठपणा हा जवळ जवळ सर्वच गंभीर आजारांमधला महत्त्वाचा घटक आहे. ४ मार्च रोजी जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त ‘द २०२१ अॅटलास रिपोर्ट’ प्रसिद्ध झाला. त्यात असे म्हटले आहे की कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वात मुख्य कारण हे लठ्ठपणा होते. तसेच ज्या देशांमध्ये लठ्ठ व्यक्तींची संख्या जास्त आहे, तिथला मृत्यूदर हा कमी लठ्ठ व्यक्ती असलेल्या देशांपेक्षा जास्त आहे.
आकडेवारी काय सांगते ?
‘द २०२१ अॅटलास रिपोर्ट’ नुसार फेब्रुवारी २०२१च्या शेवटी २.२ दशलक्ष लोकांचा कोविडमुळे मृत्यू झाला. या देशांमधल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या लठ्ठ होती. इंग्लडमधल्या अहवालानुसार रुग्णालयात कोविड-१९मुळे भर्ती झालेल्या व्यक्तींच्या ३६ टक्के लोक हे फारशी शारीरिक हालचाली न करणारे आणि अति वजन असणारे होते. फॅन एट अल (२०२०)च्या अंदाजाप्रमाणे १ मार्च आणि १४ मार्च २०२० या काळात अमेरिकेत कोविड-१९ झालेल्या लोकांपैकी १०.५ टक्के लोक लठ्ठ होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या मते, “कोविड-१९मुळे २०२०-२०२१ च्या कालावधीत जागतिक उत्पादन कमीत-कमी १० ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होईल आणि २०२०-२०२५ या कालावधीत ते २२ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचेल.” असेही अनुमान आहे. लठ्ठपणासारख्या घटकांमुळे या आजाराची तीव्रता वाढू शकते आणि दीर्घ कालावधीत हे नुकसान ६ ते ७ ट्रिलियनपर्यंत वाढू शकते.
भारतातील लोकांचा बाॅडी मास इंडेक्स आदर्श नाही -
देशाची स्थिती, नागरिकांचे अंदाजे वय, वैद्यकीय विकास आणि अनेक घटकांच्या मदतीने हे सर्वेक्षण केले आहे. अनेक देशांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणामध्ये भारताबद्दल बरेच काही आहे. या अहवालानुसार बाॅडी मास इंडेक्स भारतासाठी आदर्श नाही. ज्या लोकांवर संशोधन केले गेले आहे त्यातसे १९.७ टक्के लोकांचे वजन जास्त होते, तर ३.९ टक्के लोक लठ्ठ होते. भारतात २०१० ते २०२५ या काळात लठ्ठ लोकांची संख्या वाढणार आहे. २०१० मध्ये लठ्ठपणाबद्दल तक्रार करणारे सुमारे २ टक्के पुरुष होते, जे २०२५ पर्यंत ते ५.३ टक्के होण्याचा अंदाज आहे. जर आपण या संख्येचा विचार केला तर २०२५ पर्यंत अंदाजे २६,३२१.८ पुरुष लठ्ठपणाचे बळी ठरतील असा अंदाज आहे. त्याच वेळी जर आपण या श्रेणीतील महिलांशी संबंधित आकडेवारी पाहिली तर २०१० मध्ये ही आकडेवारी ४ टक्के होती, जी २०२५ पर्यंत ८.४ होईल, अशी अपेक्षा आहे. म्हणजे ३९,६०४.७ स्त्रिया लठ्ठ असतील. अलीकडच्या काळात लठ्ठपणाची समस्या मुलांमध्येही वाढली आहे. आकडेवारीनुसार २०१० मध्ये लठ्ठ मुले आणि तरुण १ टक्का होते. पण २०२५ पर्यंत त्यांची संख्या ५.१ टक्के म्हणजे १८,२९४.१ होण्याची शक्यता आहे.
मृत्यू दरावर अन्नाचाही परिणाम -
सर्वेक्षणात लठ्ठपणा अन्नामुळे कसा होतो याचाही अभ्यास केला आहे. यात दोन भाग केले आहेत. आरोग्यदायी आहार ज्यात डाळी, कंदमुळे आणि मांसाहार, शुद्ध तेल आणि ग्लुकोज, साखर असलेले पदार्थ असे वर्गीकरण केले गेले. यात असे दिसून आले की कोविड १९ने ज्यांचा मृत्यू झाला त्यात आरोग्यदायी आहार घेणाऱ्यांची संख्या लठ्ठपणा देणारे साखरेचे पदार्थ खाणाऱ्यांपेक्षा खूपच कमी होती. म्हणूनच, आता लठ्ठपणा ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. आपली जीवनशैली आणि आहाराच्या सवयी यांकडे लक्ष देण्याची तातडीने गरज आहे. वाढलेले वजन आणि लठ्ठपणा यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. ते आणखी बिघडू शकतात. तेव्हा प्रत्येकाने निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यावरच सर्व लक्ष दिले पाहिजे.