हैदराबाद : तुम्ही कधी गाजराच्या खिरीचा (Carrot Kheer) आस्वाद घेतला आहे का? हिवाळ्यात गाजराची खीर कोणाला आवडत नाही. ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना… हिवाळ्यात गाजराचे भरपूर सेवन केले जाते. गाजराची खीर ही एक पौष्टिक रेसिपी आहे. ही खीर काही मिनिटांमध्येच तयार होते. सण-उत्सवानिमित्त तुम्ही गाजराच्या खिरीचा खास बेत आखू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याची रेसिपी- (Carrot kheer Recipe)
गाजराची खीर बनवायला लागणारे साहित्य : 1. गाजर - 300 ग्रॅम, 2. दूध - 2.5 लिटर, 3. वेलची - 4-5, 5. बदाम - 25 ग्रॅम, 6. काजू- 12-15, 7. साखर - 1.5 कप, 8. गुलाबाच्या पाकळ्या- 8-10. 9. केसर
गाजराची खीर बनवण्याची कृती : 1. सर्व प्रथम, गाजर पूर्णपणे धुऊन स्वच्छ करा. 2. यानंतर गाजर सुती कापडाने स्वच्छ आणि कोरडे करून घ्या. 3. गाजर किसून घ्या आणि वेगळ्या भांड्यात ठेवा. 4. यानंतर एका खोलगट भांड्यात दूध घ्या. ते दूध मध्यम आचेवर गरम करा. 5. दूध 2-3 मिनिटे गरम करा आणि उकळू लागल्यावर त्यात किसलेले गाजर घाला. 6. यानंतर 4-5 मिनिटे खीर शिजवा. 7. खीर घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड आणि साखर घाला. 8. खीर झाकून ठेवा आणि मंद आचेवर 10 मिनिटे शिजवा. 9. त्यानंतर त्यात काजूचे काप करून टाका. 10. यानंतर, खीर मऊ होईपर्यंत शिजवा. 11. तुमची खीर तयार आहे. बदाम, गुलाबाच्या पाकळ्या, केसर आणि काजूने सजवा. आता पाहुण्यांना सर्व्ह करा आणि तुम्ही सुद्धा गाजर खीर खाण्याचा आनंद घ्या.
गाजर खाण्याचे फायदे : गाजर शरीरातील व्हिटॅमिन ए आणि ई ची कमतरता दूर करतो. याची शरीरात कमतरता असेल तर त्वचेत कोरडेपणा, केस तुटणे, नखे खराब होणे अशा समस्या उद्भवतात. व्हिटॅमिन ए आपल्या शरीराचे हाड आणि दातांसाठी आवश्यक असते. तसेच गाजराचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी मजबूत होते. (Benefits of eating carrots)