मुंबई - लैंगिक उत्तेजना देणाऱ्या गोळ्या (PDE5 Inhibitors) कशा काम करतात आणि बेडमधील एखाद्याची कामगिरी वाढवणाऱ्या गोळ्या म्हणून त्या कशा प्रसिद्धीस आल्या, याविषयी जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतने अॅन्ड्रोलॉजिस्ट डॉ. राहुल रेड्डी यांच्याशी चर्चा करून या गोळ्या व त्यांचे मूलभूत कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
‘व्हायग्रा’ या सेक्ससाठी वापरल्या जाणाऱ्या गोळीविषयीची मिथके/भ्रम...
बेडमधील, अंथरुणातील कामगिरी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, जो बहुतांश पुरुषांना वेड लावत असतो. परंतु, बेडमधील कामगिरीचा आवश्यकतेपेक्षा जास्त विचार चिंतेचे कारण बनतो आणि त्याचा परिणाम म्हणून लैंगिक कार्य बिघडते. सेक्ससाठी, लैंगिक ताठरतेसाठी आवश्यक स्त्राव निर्माण होण्याचे कार्य बिघडल्याने त्यावर उपाय म्हणून सर्वप्रथम पुरुषांकरिता सेक्स गोळी निर्माण केली गेली होती. परंतु, या औषधाच्या सेवनाने बेडमधील कामगिरी सुखावणारी असेल (जास्त काळ सेक्स करता येईल) असे वाटून अनेक तरुण ही गोळी घेऊ लागले आणि या गोळीसंबंधी नवीन मिथके तयार झाली.
सेक्स पिल्स, लैंगिक उत्तेजना देणाऱ्या गोळ्या नेमक्या काय आहेत आणि त्या कशासाठी दिल्या जातात?
या पीडीई 5 इनहिबिटर (व्हायग्रा नावाच्या ब्रँडने ओळखल्या जाणाऱ्या सेक्स पिल्स) नावाच्या गोळ्या ज्या लोकांना पल्मोनरी हायपोटेन्शन (फुफ्फुसाचा उच्च रक्तदाब) आहे, त्यांच्यासाठी लिहून देण्यात आल्या होत्या. परंतु, जेव्हा लोकांनी ही औषधे घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना अचानक लिंगामध्ये ताठरता जाणवू लागला. तेथून पुढे ज्या लोकांना लिंग ताठरतेची समस्या (इरेक्टाइल डिस्फंक्शन) होती त्यांच्यासाठी हे औषध वापरण्यास सुरुवात झाली.
या प्रकारची किती औषधे भारतात उपलब्ध आहेत?
भारतात सिल्डेनाफिल, टाडालाफिल आणि वर्डेनाफिल ही तीन औषधे सर्वसामान्यपणे लिंग ताठरतेसाठी म्हणून दिली जातात. परंतु, तिन्ही औषधांचा वापर वेगळा आहे. लिंग ताठरतेच्या समस्येवर सिल्डेनाफिल उपचार करीत नाही. परंतु, पुरुषांच्या लिंगामध्ये तात्पुरत्या स्वरूपात रक्तपुरवठा वाढवून लैंगिक उत्तेजना निर्माण करते. टाडालाफिलचा योग्य प्रमाणात/कमी डोस घेतल्यास ते लिंग ताठरतेच्या समस्येवर उपचारात्मक काम करते. तर, वर्डेनाफिल देखील टाडालाफिल सारखेच कार्य करते परंतु, यामुळे काही दुष्परिणाम, साइड इफेक्ट्सदेखील येतात.
या गोळ्यांविषयीची सर्वसामान्य मिथके कोणती?
बेडमधील आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी म्हणून ही गोळी मदत करते अशी अनेकांची धारणा आहे. पण ते खरे नाही. ही गोळी कामगिरीच्या पातळीवर कोणताही चमत्कार करत नाही. ज्या लोकांमध्ये लिंग ताठरतेची समस्या आहे, अशा लोकांनी संभोगाच्या अगोदर एक तास सिल्डेनाफिल (व्हायग्रा) ही गोळी घेतल्यास, पुरुषांच्या लिंगात/जननेंद्रियात रक्तप्रवाह वाढविते ज्यामुळे त्यांच्या लिंगात ताठरता येते. या गोळीचा प्रभाव पुढील ६ ते ८ तासांपर्यंत टिकून राहू शकतो.
महिलासुद्धा ही गोळी घेऊ शकतात?
होय, महिला देखील या गोळ्या घेऊ शकतात परंतु, स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या गोळ्या पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. हायपोएक्टिव्ह सेक्श्युअल डिझायर डिसऑर्डर/संभोग इच्छा उत्पन्न न होणाऱ्या महिलांना या गोळ्या (फ्लिबेंसरिन) दिल्या जातात. लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्या महिलांमध्ये सेक्स भावना जागृत होत नाहीत, त्यांना ही गोळी दिली जाते.
ही गोळी दररोज घेतली जाऊ शकते का?
जेव्हा-जेव्हा पुरुष किंवा स्त्रिया संभोग करण्यास प्राधान्य देतात, तेव्हा पुरुषांमध्ये तात्पुरती ताठरता निर्माण होण्यासाठी ही गोळी (सिल्डेनाफिल) घेण्याचा सल्ला देण्यात येतो तर महिलांच्या सेक्स भावनांना उत्तेजन देण्यासाठी (फ्लिबेंसरिन) ही गोळी मदत करते.
पुरुषांनी ED शिवाय ही गोळी घेतल्यास काय परिणाम होतो?
ED शिवाय ही गोळी घेतल्यास पुरुषांमध्ये (डोकेदुखी, मळमळ, दृष्टीदोष आणि स्नायू कडक होणे) यांसारखे दुष्परिणाम जाणवू लागतात. म्हणूनच या गोळ्या घेताना डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे आवश्यक आहे.
या गोळ्यांच्या वापराविषयी आपण काय लक्षात घेतले पाहिजे?
पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही हे समजणे आवश्यक आहे, की पीडीई 5 इनहिबिटर हे असे औषध आहे जे पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनचे बिघडलेले कार्य सुरळीत करण्यासाठी वापरले जाते. परंतु, या औषधाच्या सेवनाने तात्पुरती लिंग ताठरता निर्माण होते. त्यामुळे ज्यांना ही लिंग ताठरतेची समस्या आहे आणि संभोग करायचा आहे त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की हे औषध फक्त विशिष्ट कालावधीसाठी ताठरता/उत्तेजना निर्माण करू शकते परंतु याचा बेडमधील कार्यक्षमतेशी दुरान्वयेही संबंध नाही. (संभोगाच्या एक तासापूर्वी औषध घेतल्यास पुढील ६ ते ८ तास याचा परिणाम दिसून येतो). इरेक्टाइल डिस्फंक्शन सुधारणे हे या औषधांचे प्राथमिक कार्य आहे. तर, सिल्डेनाफिल तात्पुरत्या काळासाठी ताठरता निर्माण करण्यात मदत करते.
तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर andrologistdoctor@gmail.comवर डॉ. राहुल रेड्डी यांच्याशी संपर्क साधू शकता.