पुणे : हृदयविकाराची काही समस्या निर्माण झाली की सध्या ॲन्जिओप्लास्टी करावी असा सल्ला दिला जातो. मात्र ॲन्जिओप्लास्टी, बायपास या गोष्टी स्वल्पविराम आहे. हृदयविकाराला पूर्णविराम द्यायचा असल्यास त्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैलीच बदलावी लागते. ॲन्जिओप्लास्टी आज केली तर सहा महिन्यांनी पुन्हा दुसरी करावी लागते. त्यामुळे या आजाराला केवळ स्वल्पविराम मिळतो. हेच तुम्ही वजन कमी केलं, मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवलं, औषधे वेळेवर घेतली आणि डाएट कंट्रोल ठेवाल, तर मग याला पूर्णविराम मिळू शकतो. या सगळ्यावर उपाय, योग्य मार्गदर्शन आणि उपायांसाठी डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी भारतात पहिल्यांदा मेडिकल जिम या ‘अलोहा’ ( Aloha Heart gym ) नावानं कन्सेप्ट सुरू केली.
सर्वसामान्य आणि धडधाकट असलेले आपण जिमला जातो. परंतु हृदयविकार असणाऱ्यांना तिथं उभं केलं जात नाही. त्यांना माहीत असतं की, अशा लोकांकडून व्यायाम करून घेतला आणि त्यांना काही झाले, तर काय करणार? म्हणून मग आम्ही डॉक्टर मॉनिटर आणि डॉक्टर कंट्रोलद्वारे आर्टिफिशियल जिमची संकल्पना आणली. प्रत्येक पेशंटची व्यायामाची कॅपॅसिटी वेगळी असते. त्या अनुषंगाने त्या पेशंटची एक्झरसाईज टेस्ट ( Patient Exercise Test ) करून कॅपॅसिटी मोजतो. त्याच्या ५० टक्के आम्ही व्यायाम सुरू करतो. एक्झरसाईज इम्प्लिमेंटनुसार तीव्रता वाढवता येते. हे सगळं करत असताना पेशंटला ईसीजी लावलेला असतो. हा व्यायाम करताना आम्ही मॉनिटर करत असतो. ही सर्व मशिन इंटरनॅशनल आहे. काही चेंज झाला तर ऑटोमॅटिकली मशिन थांबते किंवा त्याचा लोड कमी होतो. या स्वरूपाचा सेट अप कोणत्याही जिमला नसतो. व्यायाम करताना काही झालं, तर आपल्याकडे आयसीयू सारखी सोय आहे. जिथं मॉनिटर, व्हेंटिलेटर सर्व काही आयसीयूमधील सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट इथे लगेच दिली जाते. रिस्क टाळण्यासाठी हे उपयोगी पडते. त्यामुळे ज्यांचे हृदय २० टक्क्यांनी सुरू आहे, अशा लोकांकडूनही व्यायाम करून घेता येतो. आम्ही दोन ते तीन महिन्यांमध्ये त्यांच्या कॅपिसिटीच्या शंभर ते दीडशे टक्के व्यायाम करून घेऊ शकतो. तीन महिने इथे व्यायाम केला तरी ते घरी करू शकतात.
मेडिकल जिमच का?
नॉर्मल जिममध्ये दहावी ते बारावी कुठल्याही स्वरूपाचे ट्रेनर असतात. बॉडी बनवणे, वेगवेगळ्या पावडर देणे, इंजेक्शन देणे या गोष्टी होतात, तसे आमच्याकडे नाही. आमच्याकडे क्वालिफाईड डॉक्टर आहेत. मी कार्डिऑलॉजी प्रॅक्टिसनंतर बारा वर्षे या क्षेत्रात आहे. सध्या लोकांना शॉर्टकट हवा असतो. त्यामुळे त्यांना व्यायाम करा हे सांगणं पटवून देणं हे अवघड आहे. त्यांना क्विक रिझल्ट हवा असतो. एक इंजेक्शन द्या आणि मला बरे करा, असा त्यांचा अॅप्रोच असतो. परंतु तसं नसतं आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची आश्वासने देत नसतो. अॅन्जिओप्लास्टी, बायपास हे फ्यूचर नाही. प्रिव्हेंशन हेच फ्युचर आहे. पुढे जाऊन तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच सावध असणं गरजेचं आहे.