हैदराबाद - दारूमुळे कितीही हानी होत असली तरी आजकाल तरुणांमध्ये दारू अतिशय लोकप्रिय आहे. मग ती पार्टी असो किंवा वीकेण्डचा श्रमपरिहार. दारूशिवाय चालत नाहीच. दारू पिण्याने आरोग्यावर दूरगामी परिणाम होत असतात. पण अगदी ताबडतोब दुसऱ्या दिवशी येणारा अनुभव म्हणजे 'हँगओव्हर.'
आंध्र प्रदेशमधल्या अमृत आयुर्वेदिक रुग्णालयाच्या एम. आयुर्वेद असलेल्या डॉ. निर्मला देवी सांगतात, 'आपल्या क्षमतेनुसार योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात, योग्य वेळेत दारू घेतली तर ती अमृताप्रमाणे असते. पण त्याचे व्यसन जडले, तर मात्र ते मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करते.'
आयुर्वेद सांगते चुकीच्या पद्धतीने दारू प्यायल्याने आजार होतात. आयुर्वेदात त्याला मदात्याया म्हणतात. लक्षणांप्रमाणे ते 4 भागांमध्ये विभागले जातात. डॉ. निर्मला त्याबद्दल पुढीलप्रमाणे सांगतात -
१. पनात्याया ( जास्त मद्यपान केल्याने तीव्र नशा )
२. परमदा ( हँगओव्हर )
३. पनाजिर्ण ( मद्यपानामुळे जठराला सूज )
४. पनाविभ्रम ( तीव्र मद्यविकार )
हँगओव्हरची लक्षणे
आदल्या रात्री खूप मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हरचा अनुभव येतो. डॉ. निर्मला यांनी सांगितलेली लक्षणे पुढीलप्रमाणे –
- डोळे रक्तासारखे लाल होणे
- अतिशय तहान लागणे
- डोकेदुखी
- उजेड आणि आवाज नकोसा होणे
- श्वासाला दुर्गंधी
- तोंडात जास्त लाळ येणे
- एकाग्रता न होणे
- उत्साह न वाटणे
- हृदयाचे ठोके वाढणे
- चक्कर येणे
- मळमळ, उलट्या किंवा अति सार
- थरथर होणे
'दारू प्यायल्यानंतर हँगओव्हरची लक्षणे खूप असतील तर त्या व्यक्तीला दारूमुळे विषबाधा झाली असावी. ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे आणि यावर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यायला हवी.' असे तज्ज्ञ सांगतात.
हँगओव्हरवर मात कशी कराल ?
'हँगओव्हर होऊ नये म्हणून तुम्ही मद्यपान अजिबातच करू नका किंवा दारू प्रमाणात प्या. शरीराला दारूवर प्रक्रिया करण्यास पुरेसा वेळ द्या. पाठोपाठ त्याचे सेवन करू नका. हँगओव्हरवर उपाय नाही, पण त्याची लक्षणे कमी करता येतात किंवा लक्षणांपासून मुक्ती मिळू शकते.' डॉ. निर्मला सांगतात.
बऱ्याचदा हँगओव्हर संपायला 24 तास लागतात. यासाठी आमच्या तज्ज्ञांनी सुचवलेले काही उपाय तुम्हीही करून पाहू शकता.
खार्जुरादी मंथा : हा एक सुंदर पदार्थ आहे. खजूर, चिंच, मनुका आणि डाळिंब समप्रमाणात वापरून केलेली कृती पुढीलप्रमाणे –
- खजूर, चिंच आणि मनुका चार तास पाण्यात भिजवा
- सर्व साहित्य एकत्र करून त्यांची छान पेस्ट तयार करा.
- आता 1: 4 च्या प्रमाणात पाणी घाला आणि त्याचे सेवन करा.
डोस : सकाळी 100 मिली.
संध्याकाळी 100 मिली.
खार्जुरादी मंथा तुम्हाला त्वरित ऊर्जा देते, हँगओव्हरची लक्षणे कमी करते आणि याचे सेवन करणे सोपे आहे.
हँगओव्हरसाठी फायदेशीर असणारी काही आयुर्वेदिक औषधेही आहेत. ही औषधे घेण्याआधी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- फलित्रिकादी चुर्ण
- अष्टांग लवण
- एलादी मोदक
- महा कल्याणक घ्रुत
- पुनर्नवादी घ्रुत
- ब्रुहात धर्ती तैल
मद्यपानामुळे होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून काही वनस्पती आहेत. पण त्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे. याशिवाय भरपूर पाणी पिणे, पौष्टिक अन्नाचे सेवन करणे आणि मुबलक विश्रांती घेणे या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. मद्यपान आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे ते न घेतलेलेच चांगले.