हैदराबाद - काही माध्यमांनी सांगितले की, सध्या फ्लूची लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे हे प्रमाण वाढले आहे. बाजारात फ्लूच्या लशीचा सध्या गवगवा आहे. कारण लोकांना वाटत आहे की ही लस कोविड १९पासून आपले संरक्षण करते. मात्र, हा मोठा गैरसमज आहे. लोकांनी हे समजून घ्यायला हवे की, फ्लू आणि कोविड १९ हे दोन्ही रोग वेगवेगळ्या विषाणूंपासून होतात. म्हणूनच त्या दोघांच्या लशी संपूर्ण वेगळ्या आहेत. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही इंदूरच्या अॅपल हॉस्पिटलचे डॉ. संजय के. जैन, एमबीबीएस, एमडी (मेडिसिन) यांच्याशी बातचीत केली.
फ्लू आणि कोविड १९ मधील मूलभूत फरक -
- कोविड १९ चा संसर्ग सार्स-कोव्ही -२ विषाणूमुळे होतो, तर फ्लू इन्फ्लुएंझा ए आणि बी विषाणूमुळे पसरतो.
- कोविड १९ हा मुख्यत: श्वसन रोग आहे, जिथे विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो, तर फ्लूमध्ये हा विषाणू जास्त करून नाक आणि घशापर्यंत मर्यादित राहतो.
- कोविड १९ विषाणू १४ ते २१ दिवसांपर्यंत संक्रमक असू शकतो, तर फ्लू विषाणू सुमारे ७ दिवस राहू शकतो.
- कोविड १९चा विषाणू सामान्य फ्लूपेक्षा अधिक गंभीर आणि जीवघेणा आहे. फ्लू आणि कोविडमधील फरक
फ्लूची लस कोविड १९ पासून संरक्षण करण्याचे काम करू शकते का ?
या प्रश्नाचे उत्तर डॉ. संजय नाही, असे दिले. फ्लूची लस कोरोना या नव्या विषाणू विरूद्ध ढाल म्हणून काम करू शकत नाही. डॉ. संजय यांनी यामागचे कारणही सांगितले. प्रत्येक विषाणूची स्वतःची रचना वेगळी असते आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट विषाणूसाठी लस तयार केली जाते, तेव्हा एखाद्या व्यक्तीचे त्या विषाणूपासूनच संरक्षण करता येते. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास, फ्लू किंवा स्वाइन फ्लूसाठी उपलब्ध लसीकरण एखाद्या व्यक्तीला केवळ त्या विशिष्ट विषाणूची लागण होण्यापासूनच प्रतिबंधित करते आणि इतर कोणत्याही विशिष्ट विषाणूवर तीच लस प्रभावी ठरणार नाही.
लस म्हणजे काय?
लस तयार करण्याची प्रक्रिया कमीत कमी प्रत्येक विषाणूसारखी असते. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) स्पष्ट करतात की लसींमध्ये ज्यामुळे रोग होतो तेच जंतू असतात. (उदाहरणार्थ गोवर लसीमध्ये गोवर विषाणू असतो आणि एचआयबीच्या लसीमध्ये एचआयबी बॅक्टेरिया असतात.) परंतु ते एक तर मारले गेले किंवा कमकुवत केले असतात. त्यामुळे ते आपल्याला आजारी पाडत नाहीत. काही लसींमध्ये रोगाच्या जंतूचा फक्त एक भाग असतो.
पुढे आमचे तज्ज्ञ स्पष्ट करतात की, आपल्या शरीरात त्वचेखाली लसी टोचल्या जातात. एकदा इंजेक्शन दिल्यानंतर, लस आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस उत्तेजन देते आणि विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी अँटिबॉडी तयार करतात. अँटिबॉडी तयार होण्यासाठी २ ते ४ आठवडे लागतात. त्यानंतर ठराविक रोगाविरोधात तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. ही रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो. काही लसींमुळे रोगप्रतिकारक शक्ती वर्ष – दोन वर्ष टिकू शकते. उदाहरणार्थ, स्वाइन फ्लू लसीची रोगप्रतिकारक शक्ती १ वर्ष टिकते. पण अद्यापि आपल्याला कोविड १९ च्या लसीचा तपशील माहीत नाही.
बऱ्याचदा लस ही कमकुवत जंतूंचा वापर करूनच तयार केली जाते. ती टोचताना वेदना होऊ शकतात. किंवा एक- दोन थोडा ताप, थोडी डोकेदुखी, शरीराच वेदना इत्यादी होऊ शकते. यावर पॅरॅसिटेमोल चांगले औषध आहे. अगदी अपवादाने लसीची रिअॅक्शन येऊ शकते. पण ते प्रमाण खूपच कमी आहे. एखाद्या व्यक्तीचे शरीर आधीच प्रतिरक्षाविरोधी असेल तर त्याला मेंदुज्वर, न्यूरोपॅथी किंवा मायोपॅथी इत्यादीसारखी न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकते, पण हे खूपच अपवादाने होते.
फ्लू लसीची कोणाला गरज आहे ?
डॉ. संजय सांगतात, आतापर्यंत माझ्या लक्षात आले आहे की लोक फ्लूची लस घेण्याबद्दल फारसे गंभीर नाहीत. खरे तर ती सगळ्यांनीच घेतली पाहिजे. पण जागरुकता नसल्याने लोक ही लस घेत नाहीत. ते सांगतात, ‘ अगदी सगळ्यांनी नाही घेतली तरी जास्त धोका असलेल्या लोकांना मी फ्लू विषाणूंविरूद्ध लस देण्याचा सल्ला देतो. वृद्ध लोक, मधुमेह, हृदयरोग, गुडघे प्रत्यारोपणाचे रुग्ण, डायलिसिस रूग्ण, केमोथेरपी घेतलेले कर्करोगाचे रुग्ण, बेडरिडन रूग्ण यांनी ही लस घ्यायलाच हवी. या लोकांना न्युमोनिया आणि फ्लू होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा या लोकांनी ती लस घेतलीच पाहिजे. याशिवाय, मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांसाठी फ्लूची लस देण्याची शिफारस केली जाते. बाजारात ही लस मिळते, याबद्दल जागरुकता निर्माण केली पाहिजे. समाजासाठी ती चांगली आहे. यामुळे होणारी रोगप्रतिकारक शक्ती वर्ष- २ वर्ष टिकते.
म्हणूनच, लस ज्यासाठी ती तयार केली जाते केवळ त्याच एका विशिष्ट विषाणूसाठीच काम करते. डॉ.संजय हे देखील माहिती देतात की लस बनण्यात ३ - ५ वर्षे लागतात. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय प्रगतीच्या मदतीने कोविड १९ विषाणूची लस फारच कमी कालावधीत विकसित केली गेली आहे.